मुंबई : राज्यात पालिका निवडणुकांचा बिगुल वाजला असून नगरपालिका प्रभाग रचनेचा कार्यक्रम मंगळवारी जाहीर करण्यात आल्याने लवकरच निवडणुका होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यात जिल्ह्यातील 15 नगरपालिकांचा समावेश असल्याने राजकीय वातावरण तापणार आहे.

कोरोनामुळे लांबल्या निवडणूक
कोरोनाच्या आपत्तीमुळे मार्च 2020 पासून ते डिसेंबर 2021 पर्यंत राज्यातील अनेक नगरपालिकांच्या निवडणुका प्रलंबीत आहेत. यातच मध्यंतरी कोरोनाचा प्रकोप कमी झाला असला तरी ओबीसी आरक्षणाचा मुद्दा आल्याने निवडणुका पुढे ढकलण्यात येतील, अशी स्थिती निर्माण झाली. याच वातावरणात राज्यातील नगरपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. यानंतर जिल्हा परीरषद, पंचायत समिती आणि नगरपालिकांच्या निवडणुकांबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. यातील जिल्हा परिषदेचे गट आणि गणांचा कार्यक्रम मध्यंतरी पार पडला असून याबाबत लवकरच घोषणा होण्याची शक्यता असली तरी नगरपालिकेबाबत अद्यापही सस्पेन्सचे वातावरण होते.
अखेर प्रभाग रचना जाहीर
या पार्श्वभूमिवर, राज्य निवडणूक आयोगाने एका परिपत्रकाच्या माध्यमातून नगरपालिका निवडणुकांमधील सर्वात महत्वाचा घटक असणार्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यानुसार राज्यातील अ, ब आणि क वर्गात येणार्या नगरपालिकांसाठी प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे. यात अ वर्ग नगरपालिकांचे मुख्याधिकारी 2 मार्चपर्यंत प्रभाग रचना राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविणार असून आयोग याला 7 मार्च 2022 रोजी मान्यता देणार आहे. यावर 10 ते 17 मार्चच्या दरम्यान हरकती घेता येतील. यावरील सुनावणी 22 मार्च रोजी होईल. जिल्हाधिकारी याला 25 मार्च रोजी राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवतील. तर 1 एप्रिल 2022 रोजी अंतिम प्रभाग रचनेला मान्यता मिळणार आहे. हीच प्रभाग रचना जिल्हाधिकारी 5 एप्रिल 2022 रोजी जाहीर करतील.
ब व क वर्गासाठीदेखील हाच कार्यक्रम
दरम्यान, ब आणि क वर्गातील नगरपालिकांसाठी हाच कार्यक्रम असून यात राज्य निवडणूक आयोगाकडे नव्हे तर पहिल्यांदा जिल्हाधिकार्यांकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. अर्थात, यासाठी नगरपालिकांचे मुख्याधिकारी 2 मार्चपर्यंत प्रभाग रचना जिल्हाधिकार्यांकडे पाठविणार असून ते याला 7 मार्च 2022 रोजी मान्यता देणार आहे. यावर 10 ते 17 मार्चच्या दरम्यान हरकती घेता येतील. यावरील सुनावणी 22 मार्च रोजी होईल. तर 1 एप्रिल 2022 रोजी अंतिम प्रभाग रचनेला मान्यता मिळणार आहे. हीच प्रभाग रचना जिल्हाधिकारी 5 एप्रिल 2022 रोजी जाहीर करतील. यामुळे निवडणुका एप्रिलचा अखेरचा आठवडा अथवा मे महिन्यात होण्याची शक्यता आहे.
या शहरांमध्ये होणार निवडणूक
जळगाव जिल्ह्याचा विचार केला असता, भुसावळ ही अ वर्गातील नगरपालिका असून यासोबत अमळनेर, चोपडा, चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, वरणगाव, धरणगाव, एरंडोल, फैजपूर, पारोळा, रावेर, सावदा, यावल आणि नव्यानेच अस्तित्वात आलेल्या नशिराबाद येथे निवडणुका होणार आहेत.


