जळगाव जिल्हा हा विकासाचा जिल्हा झाला पाहिजे – पालकमंत्री गुलाबराव पाटील


भुसावळ (प्रतिनिधी) – लोक सर्वात जास्त काम करणा-या व्यक्तीची किंमत करतात. प्रत्येकांने काम केले तरच गल्लीपासून वार्डासह शहराचा विकास होऊ शकतो. मतदार हा सावकार आहे. मतदारांसमोर लोकप्रतिनिधींची इमेज असलीच पाहिजे. लोकप्रतिनिधी हा तत्पर असला पाहिजे. पक्ष कोणता यापेक्षा समस्या काय? ही जाणीव त्याला असली पाहिजे. विकासाचे ध्येय असले पाहिजे. म्हणून कामे केली पाहिजे. असा सल्ला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी शहरातील विविध भागात सहा कोटी २२ लाख रुपये किंमतीच्या विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले. शहरातील श्रीनगर व जामनेर रोडवरील मान रेसीडेन्सीजवळ तसेच डी.एस.हायस्कूलमध्ये पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत विकासकामांचा शुभारंभ झाला. यावेळी ना. गुलाबराव पाटील बोलत होते.
यांची व्यासपीठावर उपस्थिती
यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार संजय सावकारे, प्रशासक तथा प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे, मुख्याधिकारी संदीप चिद्रवार, डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, माजी नगराध्यक्ष रमण भोळे, बाजारपेठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड, जिल्हाप्रमुख समाधान महाजन, विश्वनाथ पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
ना. पाटील पुढे म्हणाले की, पालकमंत्री हा संपूर्ण जिल्हाचा असतो. प्रशासकांनी संधीचे सोनं करीत रस्त्यांच्या कामाची जबाबदारी पूर्ण करून विकास कामे केली पाहिजे. पालकमंत्री या नात्याने जळगाव शहराला १२० कोटी रुपये मंजूर केले तर ७० कोटींचे कामे सुरु आहेत. जळगावप्रमाणे भुसावळ शहराचा विकास करेल, भुसावळ ब दर्जाचे शहर आहे. रेल्वेमुळे भारतभर भुसावळ शहर प्रसिद्ध आहे. म्हणून शहरविकास ही सर्वांचीच जबाबदारी आहे. येत्या निवडणुकीत कोणाच्या हाती कोणता झेंडा राहील हे सांगता येत नाही, अशी मिश्किल टीका त्यांनी केली.
शहरातील वाढती गुंडगिरी नियंत्रणात येण्यासाठी तसेच पोलिस प्रशासनाला सहकार्य म्हणून शहरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याकरीता जळगाव व भुसावळसाठी ११ कोटी निधी मंजूर केले आहेत, असे सांगून बाजारपेठ पोलिस स्टेशन नूतनीकरणाकरीता निधी त्वरीत मंजूरीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. तसेच पोलिस प्रशासनास नवीन जीप गाड्या देणार असल्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. त्यासाठी निधी उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही देत म्हणाले. पोलिस कर्मचा-यांना चांगली निवासस्थाने उपलब्ध व्हावीत यासाठी जिल्हात भुसावळ, चोपडा, जामनेर येथे दर्जेदार पोलिस वसाहतीकरीता गृह खात्याकडे प्रस्ताव दिला आहे.
भुसावळात शहरात गुन्हेगारी वाढली असून त्याचे उच्चाटन होणे काळाची गरज असून येथे पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षकांवर हात उचलणारे लोक शहरात आहेत. त्यांचा बंदोबस्त गरजेचा असून शहरासाठी आपण आयपीएस दर्जाचा अधिका-याची मागणी केल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी बोलताना दिली.
जिल्हा विकासाची जवाबदारी
गुलाबराव पाटील म्हणाले की, पालकमंत्री हा एका तालुक्याचा नसून संपूर्ण जिल्ह्याचा असल्याने जवाबदारी अधिक वाढली असून जळगाव जिल्हा विकासाचा जिल्हा व्हावा यासाठी आपले अधिक प्रयत्न असल्याची ग्वाही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी येथे दिली.
..आता ‘ओम पुरीचा गाल पकडला’
धरणगावात हेमा मालिनीच्या गालासारखे गुळगुळीत रस्ते केल्याचे विधान बोदवडमधील एका कार्यक्रमात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केल्यानंतर त्यांच्यावर टिकेची झोड उठली होती. या वक्तव्यानंतर पालकमंत्री यांनी विधानाबद्दल दिलगिरी व्यक्त केल्यानंतर वादावर पडदा पडला होता. असे सांगून पालकमंत्र्यांनी त्या वक्तव्याची आठवण करून देत झालेल्या त्रासाची माहिती देत म्हणून तो रस्त्यांसाठीचा संदर्भ टाळला असून खराब रस्त्यांसाठी आता ओम पुरीचा गाल पकडला असल्याने किमान आतातरी त्यावर टिका होवू नये, अशी अपेक्षा व्यक्त करताच उपस्थितांमधून हास्याचे फवारे उडाले. तसेच मतदार हुशार असून, निवडणुका आल्या की मतदार सकाळी शिवसेनेचे मटन खातात, दुपारी भाजपी शेवभाजी खाऊन रात्री काँग्रेसचे जेवन करतात. वरतून आमचे सर्वांशी चांगले संबंध असल्याचे सांगून कोणाचे मटन खातात आणि कुणाचे बटन दाबतात हे मात्र समजत नाही, असे पालकमंत्र्यांनी मिश्किलपणे सांगितले.
लोकप्रतिनिधींनी चांगली कामे न केल्याने नागरिकांनी प्रशासक राजवटीची केली मागणी – आ.सावकारे
गेल्या पंचवार्षिकमध्ये सत्ताधा-यांनी शहर विकासाचे एकही काम केले नाही. मात्र, शहरात आता चांगली कामे होत असल्याने कायमस्वरुपी प्रशासकच हवा, असे नागरीक स्पष्टपणे बोलत असल्याने खरोखरच आपण शहरात कामे केलेली नाही, असा त्याचा सरळ अर्थ आहे की काय असा प्रश्न उपस्थित करीत सत्ताधा-यांचे नाव न घेता आ. संजय सावकारे यांनी येथे आयोजित विकास कामांचे शुभारंभ प्रसंगी टोला लगावला. याप्रसंगी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
२५ वर्षात शहराचा विकास शून्य
आ. सावकारे म्हणाले की, पक्ष भेद न करता कामे व्हावीत ही भावना लोकप्रतिनिधींची असली पाहिजे. मी पालकमंत्री असता नगरपालिकेला निधी देता येत नव्हता मात्र आता नियम बदलल्याने शहरासाठी निधी मिळण्यासाठी मी स्वतः पाठपुरावा पालकमंत्र्यांकडे केला आहे. शहराच्या सुशोभीकरणासाठी निधी द्यावा, अशी मागणी केल्यानंतर पालकमंत्र्यांनी दखल घेतली शिवाय जामनेर रस्त्यासाठी मागणी केल्यानुसार निधी देण्यात आल्याचेही ते म्हणाले.
तत्कालीन सत्ताधा-यांवर डागली टिकेची तोफ
आ. म्हणाले की, लोकांनी आपल्याला लोकांची कामे करण्यासाठी निवडून दिले आहे, स्वतःच्या विकासासाठी वैयक्तिक गोष्टीसाठी नाही, असे आमदारांनी सांगून खळबळ उडवून दिली. गेल्या २० ते २५ वर्षांपासून शहराचा विकास झालेला नाही, असे सांगून ते म्हणाले की, पक्ष भेद बाजूला ठेवून शहराचा विकास झाला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.शहरातील गुंडगिरीवर नियंत्रण ठेवता येईल, मात्र राजकीय गुंडगिरी थांबविता येत नाही. अशी मिश्किल टीका करीत राष्ट्रवादीत गेलेल्या तत्कालीन सत्ताधा-यांना चिमटा काढला.
कार्यक्रमा प्रारंभी अॅड. नंदिता अनिल चौधरी यांनी शहर वासियांतर्फे पालकमंत्र्यांचे स्वागत केले. तर कार्यक्रमा
दरम्यान शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवभोजन संचालक उमाकांत शर्मा (नमा) यांनी आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेतील विजेत्यां स्पर्धकाना पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रथम अनिकेत सपकाळे, द्वितीय पुर्वा चौधरी, तृतीय इशा पाटील यांना स्मृतीचिन्ह, चांदीचे शिक्के व रोख रक्कम बक्षीस देण्यात आले.
कार्यक्रमास माजी नगरसेवक मुकेश गुंजाळ, पिंटू ठाकुर, प्रा. दिनेश राठी, देवा वाणी, माजी नगरसेवक पप्पू बारसे,राजेन्द्र नाटकर , राजेन्द्र आवटे,
संतोष बारसे, किरण कोलते, दीपक धांडे, शारदा धांडे, प्रा. सुनील नेवे, पुरुषोत्तम नारखेडे, देवेंद्र पाटील, अ‍ॅड. कैलास लोखंडे, बापू महाजन, धीरज पाटील, शहरप्रमुख बबलू ब-हाटे, नीलेश महाजन , उमाकांत शर्मा नमा , प्रकाश अहिरे, जीवन अहिरे, मिलिंद कापडे, अ‍ॅड. निर्मल दायमा, ललीत मुथा,महेश चौधरीं , पालिकेचे अधिकारी बाविस्कर, प्रदिप चौधरी यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
शहरातील विविध विकास कामांचे झाले उद्घाटन
याप्रसंगी न.पा. हद्दीतील नाहाटा चौफुली, श्रीराम डेअरीपासून ते मोटुमल शोमराज चौकपर्यंत रस्त्यावर नवीन दुभाजक तयार करणे, सुशोभीकरण करणे खर्च ६२.७२ लक्ष.नपा हद्दीतील गांधी पुतळापासून ते जॉली पेट्रोल पंपपर्यंत सुशोभित करणे खर्च रुपये ६४.५५ लक्ष, न पा हद्दीतील गांधी पुतळा ते राहूननगर तापीनदी पुलापर्यंत रस्त्यावर नवीन दुभाजक तयार करणे खर्च रु.२८.६३ लक्ष. प्रभाग क्र. १९ मध्ये केळकर हॉस्पिटलमागील ओपन स्पेस पेव्हर ब्लॉक बसवीणे व सुशोभीकरण करणे खर्च रु. २५.३८ .प्रभाग क्र.७ मधील तुषार चिरमाडे यांचे घरापासून बाळू शिरोळे, अष्टविनायक कॉलनी इत्यादी ठिकाणी काँक्रीटीकरण करणे खर्च रु. रु.७०.६५ लक्ष . तसेच वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत १.८५ कोटी रुपयांचे कामांचे उद्घाटन करण्यात आले. तसेच न पा संचालित इमारत दयाराम शिवदास विद्यालयाचे नुतनीकरण स्टॉप व विद्याथ्यांसाठी २० सिटचे बांधकाम करणे खर्च रुपये ४१.६८ लक्ष. न पा संचालित इमारत दयाराम शिवदास विद्यालयाच्या इमारतीला खिडक्या, ग्रील दरवाजे, फ्लोरिंग, पत्रे रंगकाम करणे खर्च रुपये.४७.६६ लक्ष.न पा संचालित प्रशासकीय इमारत दयाराम शिवदास विद्यालय नुतनीकरण प्लेव्हर ब्लॉक काँक्रीटीकरण, दुरूस्ती व प्लॉस्टर करणे खर्च रु. ३७ लक्ष, न पा संचालित प्रशासकीय इमारत शिक्षण मंडळाचे शाळा क्रमांक १ चे नुतनीकरण व कंपाउंड वॉलचे इमारतीचे प्लॉस्टर पुफिंग, रंगकाम करणे खर्च ३५.७४ लक्ष रुपये असा एकुण ६.२२ कोटि रुपये विकास कामांचे भूमिपूजन झाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. उत्तम सुरवाडे यांनी केले.