वरणगांव : भुसावळ तालुक्यातील काहुरखेडा येथिल शेतमजूराचा शेतामध्ये कोळपणी करीत असतांना कुठल्या तरी सरपटणाऱ्या प्राण्याने चावा घेतल्याने अकस्मात मृत्यु झाला .

याबाबतचे वृत्त असे की , काहुरखेडा येथिल शेतमजुर सुकदेव प्रल्हाद पाटील ( ५२) हे जगन मधुकर वराडे यांचे मानपुर शिवारातील गट क्र . १२१ या शेतात मजुरी करणेसाठी गेले होते . दुपारच्या वेळेस शेतमालक शेतात गेले तेंव्हा त्यांना सदरील मजुर मृतावस्थेत आढळून आला . त्यांनी लागलीच मयताचा भाऊ राजु प्रल्हाद पाटील यांना भ्रमणध्वनीद्वारे कळविले . ते लागलीच शेतात पोहचले त्यांनी वराडे यांच्या ट्रॅक्टरने मयतास वरणगांव ग्रामीण रुग्णालयात आणले असता त्यांना उचलतांना जेथे हात लागला तेथिल त्यांच्या अंगावरील साल निघून आतील पांढरी त्वचा दिसत होती . त्यावरून त्यांना रसेल वायपर सारख्या सरपटणाऱ्या प्राण्याने दंश करून त्यांचा मृत्यु झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला . दुर्दैवाने एक वर्षापूर्वी त्यांच्या पत्नीचे सुध्दा मजुरी करीत असतांना अकस्मात निधन झाले होते . त्यांच्या पश्चात पाच मुलींचा परिवार आहे. त्यामुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे . याबाबत त्यांचे भाऊ राजु पाटील यांचे फिर्यादीवरून वरणगांव पो . स्टे . ला अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली .


