जळगाव –
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील तांबोळे बुद्रुक येथील शहीद जवान सागर रामा धनगर (वय 23) यांच्यावर आज सकाळी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार झाले. सागर यांना 31 जानेवारीला मणिपूरमध्ये कर्तव्यावर असताना वीरमरण आले होते. तांबोळेवासीयांनी सागर यांना पाणावलेल्या डोळ्यांनी अखेरचा निरोप दिला. लष्कर व पोलीस प्रशासनाच्या वतीने सागर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ग्रामस्थांनी सागर यांना अखेरचा निरोप गावात ठिकठिकाणी आदरांजली वाहणारे बॅनर लावले होते. महिला व युवतींनी अंत्ययात्रा मार्गावर सडा रांगोळ्या काढल्या होत्या. फुलांनी सजवलेल्या वाहनातून पगार यांची अखेरची अंत्ययात्रा निघाली अंतयात्रा पंचक्रोशीतील हजारो ग्रामस्थ सहभागी झाले होते युवकांनी भारत माता की जय वंदे मातरम अमर रहे शहीद जवान अमर रहे अशा जयघोषात सागर यांना अखेरचा निरोप दिला

3 वर्षांपूर्वी सैन्यात झाले होते रुजू-
सागर धनगर हे चाळीसगाव तालुक्यातील तांबोळे बुद्रुक येथील रहिवासी होते. ते नोव्हेंबर 2017 मध्ये 5, मराठा इन्फन्ट्री बटालियनमध्ये रुजू झाले होते. त्यानंतर ते सध्या मणिपूर याठिकाणी सेवारत होते. 31 जानेवारी रोजी त्यांना वीरमरण आले.
वीरजवान सागर यांचे पार्थिव 1 फेब्रुवारीला रोजी दुपारी 2 वाजता मणिपूरच्या इम्फाळ येथून आसामच्या गुवाहाटीत आणले गेले. त्यानंतर पार्थिव सोमवारी सायंकाळी विमानाने मुंबईत विमानतळावर दाखल झाले होते. आज सकाळी मुंबईहून पार्थिव लष्करी वाहनाने सागर यांच्या मूळगावी तांबोळे येथे आणण्यात आले.
गेल्या 2 महिन्यांच्या काळात चाळीसगाव तालुक्यातील तिसऱ्या जवानाला वीरमरण आले आहे. यापूर्वी जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना यश दिगंबर देशमुख हे शहीद झाले होते. देशमुख हे चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगाव येथील रहिवासी होते. त्यानंतर चाळीसगाव तालुक्यातील वाकडी येथील जवान अमित साहेबराव पाटील यांचे कर्तव्यावर असताना अपघाती निधन झाले होते. त्यांच्या अंगावर बर्फाची लादी पडून ते गंभीर जखमी झाले होते. आता पुन्हा याच तालुक्यातील सागर यांना वीरमरण आले असून, जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
दरम्यान सागर यांना अखेरचा निरोप देण्यासाठी खासदार उमेश पाटील आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते



