भुसावळ ( प्रतिनिधी ) : वाढदिवस हा केवळ आनंदाचा क्षण न राहता समाजोपयोगी कार्यातूनही साजरा करता येतो, याचा प्रेरणादायी आदर्श भुसावळ येथील राही शिक्षण मंडळाने घालून दिला आहे. कु. मिनती बाळू पवार हिच्या वाढदिवसानिमित्त कंडारी (गोलाणी परिसर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल आदी आवश्यक शैक्षणिक साहित्याची मदत मिळाली. विशेषतः गरजू विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधान आणि आनंद हेच या उपक्रमाचे खरे यश ठरले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, राही शिक्षण मंडळाचे अध्यक्ष बाळू पवार, ग्रामस्थ तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी कु. मिनती पवार हिला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देत तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. "वाढदिवस साजरा करताना सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदतीचा हात देणे, हीच खरी समाजसेवा आहे," असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. समाजातील इतरांनीही अशा सामाजिक उपक्रमांतून वाढदिवस साजरे करण्याची प्रेरणा या उपक्रमातून मिनती हिने दिल्या आहे.


