भुसावळ (प्रतिनिधी) - येथील श्री राधाकृष्ण प्रभात फेरी परिवारातर्फे दरवर्षीप्रमाणे या वर्षीही गुरुपौर्णिमा उत्सव अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. २९ जुलै रोजी गुरुपौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर शहरातील पुरातन श्रीराम मंदिरात सकाळी ६:३० वा या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या मंगल प्रसंगी गुरुवर्य पंडित जगदीश शर्मा,पंडित विनोद जोशी आणि मंदिराचे पुजारी अतुल देशपांडे यांचे 'पाद्यपूजन' करून मनोभावे पूजन करण्यात आले. यानंतर त्यांना शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. उपस्थित सर्व बंधू-भगिनींनी गुरुवर्यांचे दर्शन घेऊन त्यांचे शुभ आशीर्वाद घेतले. या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष राधेश्याम लाहोटी यांनी उपस्थित भाविकांना मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या भाषणात गुरुंचे जीवनातील महत्त्व या विषयावर उपस्थितांना अत्यंत महत्त्वपूर्ण व मोलाची माहिती दिली. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात प्रभू श्रीरामचंद्रांची भव्य महाआरती करण्यात आली. महाआरती नंतर उपस्थित सर्व भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिसरातील अबालवृद्धांसह सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार संजय अग्रवाल व जे.बी.कोटेचा यांनी मानले. फोटो कॅप्शन - भुसावळ येथील पुरातन श्री राम मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त गुरूंचे पूजन करताना राधेश्याम लाहोटी व इतर.


