भुसावळ स्थानकावर स्वच्छता जनजागृती अभियानाचे आयोजन ;

भुसावळ (प्रतिनिधी) - मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळांतर्गत दिनांक 18 जून 2026 रोजी भुसावळ स्थानकावर स्वच्छतेबाबत जनजागृती वाढविणे तसेच स्थानक परिसर व रेल्वे रुळांवर कचरा टाकण्याच्या प्रवृत्तीला आळा घालण्याच्या उद्देशाने विशेष स्वच्छता जनजागृती अभियान आयोजित करण्यात आले.

या अभियानाचे आयोजन मध्य रेल्वे भारत स्काउट्स अँड गाईड्स, भुसावळ मंडळ तसेच तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांच्या संयुक्त प्रयत्नातून करण्यात आले. अभियानादरम्यान तिकीट तपासणी कर्मचारी, रेंजर्स, गाईड्स आणि स्काउट्स यांनी स्थानक परिसरात सक्रिय सहभाग घेत प्रवासी, विक्रेते तसेच रेल्वे कर्मचाऱ्यांना स्वच्छता राखण्याच्या महत्त्वाविषयी जागरूक केले.

या अभियानाद्वारे प्रवाशांना स्थानक परिसर व रेल्वे रुळांवर कचरा न टाकण्याचे, निर्धारित कचरापेट्यांचा वापर करण्याचे तसेच स्वच्छ व सुरक्षित रेल्वे वातावरण निर्माण करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी मंडळ मुख्य तिकीट निरीक्षक, मुख्य स्टेशन वाणिज्य निरीक्षक तसेच स्थानकावरील सर्व कर्मचारी उपस्थित होते. सर्वांनी स्वच्छतेप्रती आपली बांधिलकी व्यक्त करत प्रवाशांना ‘स्वच्छ भारत’ आणि ‘स्वच्छ रेल’ अभियानात सहभागी होण्याचा संदेश दिला.