भुसावळ (प्रतिनिधी) – भुसावळ विभागात कृष्णचंद्र सभागृह येथे सेवानिवृत्त रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सन्मानार्थ २९ मे रोजी भव्य सेवानिवृत्ती समारंभाचे आयोजन करण्यात आले. हा समारंभ अत्यंत आनंदी आणि भावनिक वातावरणात पार पडला. यावेळी मोठ्या संख्येने रेल्वे कर्मचारी तसेच त्यांच्या कुटुंबीयांनी उपस्थिती दर्शविली. सभागृह पूर्णतः भरलेले होते.

या प्रसंगी एकूण 66 रेल्वे कर्मचारी सेवानिवृत्त झाले. त्यापैकी 57 कर्मचारी जुन्या पेन्शन योजनेशी तर 09 कर्मचारी नव्या पेन्शन योजनेशी संबंधित होते. याशिवाय, रेल्वे सेवेत उत्कृष्ट कार्य तसेच अपघातमुक्त आणि सुरक्षित सेवा बजावल्याबद्दल 07 कर्मचाऱ्यांना “अपघातमुक्त व सुरक्षित सेवेसाठी पुरस्कार” प्रदान करून गौरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भुसावळ विभागीय रेल्वे व्यवस्थापक, , पुनीत अग्रवाल होते. यावेळी अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक (तांत्रिक) मुकेश कुमार मीणा, वरिष्ठ विभागीय कार्मिक अधिकारी दिलीप खरात, सहाय्यक कार्मिक अधिकारी सुरेंद्र हिवाळे तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.
आपल्या मनोगतात विभागीय रेल्वे व्यवस्थापक पुनीत अग्रवाल यांनी सांगितले की, रेल्वे कर्मचारी हे भारतीय रेल्वेचे कणा आहेत. कर्मचाऱ्यांच्या समर्पणभावना, शिस्तबद्धता आणि कठोर परिश्रमांचे कौतुक करत त्यांनी नमूद केले की, त्यांच्या अमूल्य योगदानामुळेच भारतीय रेल्वेची सातत्यपूर्ण प्रगती शक्य झाली आहे. त्यांनी सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना निरोगी, सुखी आणि सन्मानपूर्ण जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.
अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक (तांत्रिक) मुकेश कुमार मीणा यांनीही आपल्या भाषणात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या दीर्घ आणि उत्कृष्ट सेवाकाळाचे कौतुक करत त्यांना निरोगी, आनंदी आणि समाधानकारक आयुष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
समारंभा दरम्यान सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन देयक आदेशांच्या (पीपीओ) प्रती प्रदान करण्यात आल्या. हा समारंभ भावनिक, प्रेरणादायी आणि सन्मानपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यामुळे रेल्वे कुटुंबातील एकात्मता आणि कौटुंबिक संस्कृती अधिक दृढ झाल्याचे दिसून आले.


