भुसावळ (प्रतिनिधी) – संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना तसेच केंद्र शासनाच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ, विधवा व दिव्यांग निवृत्ती वेतन योजनांतील सर्व लाभार्थ्यांनी डिजिटल हयात प्रमाणपत्र (Digital Life Certificate) सादर करणे अनिवार्य असल्याचे आवाहन तहसीलदार निता लबडे यांनी केले आहे.

तहसील कार्यालय भुसावळ येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी नायब तहसीलदार प्रिती लुटे, पूजा अवघडे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णयानुसार पात्र लाभार्थ्यांनी Beneficiary Satyapan App (BSA) च्या माध्यमातून ऑनलाइन डिजिटल हयात प्रमाणपत्र तयार करून ते तहसील कार्यालयातील संजय गांधी योजना शाखेत सादर करणे आवश्यक आहे. लाभार्थ्यांनी स्वतः किंवा जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) मार्फत ही प्रक्रिया पूर्ण करावी.
शासनाच्या शुद्धीपत्रकानुसार डिजिटल हयात प्रमाणपत्रासाठी कमाल ५० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.
अर्ज प्रक्रियेत महत्त्वाचे बदल
विशेष सहाय्य योजनांच्या निकषांमध्ये शासनाने सुधारणा केल्याने नवीन अर्ज प्रक्रियेत काही आवश्यक कागदपत्रांचा समावेश करण्यात आला आहे. अर्जदारांनी आधारशी संलग्न मोबाईल क्रमांक, बँक खाते तपशील, जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र, पॅन कार्ड किंवा 26AS प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहणार आहे.
दिव्यांग लाभार्थ्यांसाठी UDID कार्ड सादर करणे आवश्यक असेल.
तहसील प्रशासनाने सर्व लाभार्थ्यांनी वेळेत डिजिटल हयात प्रमाणपत्र सादर करून योजनांचा लाभ अखंडितपणे सुरू ठेवावा, असे आवाहन केले आहे.
उपशीर्षक:
BSA अॅपद्वारे ऑनलाइन प्रक्रिया; CSC केंद्रांवरूनही प्रमाणपत्र सादर करण्याची सुविधा


