भुसावळात तारकेश मृत्यूप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधासह गुन्हे दाखल करा -संतप्त नागरिकांची मागणी:

भुसावळ (प्रतिनिधी ) + भुसावळ शहरातील नऊ

वर्षीय तारकेश झोपे या शाळकरी बालकाचा कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याच्या प्रकरणाने शहरात संताप व्यक्त होत आहे. या घटनेला जबाबदार धरत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व आरोग्य विभागातील संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली. याप्रकरणी भुसावळातील नागरिकांनी मोर्चा काढून सोमवारी प्रांताधिकारी, प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे तसेच शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक उद्धव डमाळे यांना निवेदन दिले.

दि.२४ एप्रिल रोजी नारायणनगर परिसरात राहणाऱ्या तारकेश झोपे या बालकावर मोकाट कुत्र्यांनी अचानक हल्ला केला. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला. त्याच्या शरीरावर तब्बल ३० टाके घालावे लागले. पुढे रेबिजचा संसर्ग झाल्याने त्याला उपचारासाठी मुंबईत हलविण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

मुख्याधिकाऱ्यांवरही कारवाईची मागणी

निवेदनात नमूद केले आहे की, या संपूर्ण प्रकरणात निष्काळजीपणा करणाऱ्या मुख्याधिकारी, आरोग्य अधिकारी, सॅनिटरी इन्स्पेक्टर तसेच संबंधित कर्मचाऱ्यांवर तत्काळ गुन्हा दाखल करून त्यांना शासकीय सेवेतून निलंबित करावे व उच्चस्तरीय विभागीय चौकशी सुरू करावी. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे झोपे कुटुंबाने एकुलता एक मुलगा गमावला असून, त्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या आधारे पालिकेच्या निधीतून पीडित कुटुंबाला किमान पाच लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

हल्ला करणाऱ्या सात कुत्र्यांना प्रशासनाने ताब्यात घेतले होते. त्यातील तीन कुत्र्यांचा मृत्यू झाला.

निवेदन देताना प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे, डॉ. नितू पाटील, युवराज लोणारी, शेखर महाजन, शैलजा पाटील, सोनम इंगळे, राजेंद्र नाटकर, सतीश सपकाळे, श्रेयस इंगळे, भूषण महाजन, पवन बुंदेले, विवेक पाटील, अमित असोदेकर, धर्मराज देवकर, संदीप सुरवाडे, दीपक धांडे उपस्थित होते.

दि. २३ फेब्रुवारी २०२४ रोजी यासंदर्भात निविदाप्रक्रिया राबविण्यात आली होती; मात्र संबंधित ठेकेदाराने ती नाकारल्यानंतर पालिकेकडून फेरनिविदा काढण्याची कोणतीही पुढील कार्यवाही करण्यात आली नाही. उलट संबंधित फाइल दाबून ठेवण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला असून, या हलगर्जीपणामुळेच शहरात मोकाट कुत्र्यांचा प्रश्न गंभीर बनला आणि त्यातूनच तारकेशचा बळी गेला, असे निवेदनात नमूद आहे.