भुसावळ (प्रतिनिधी) – नगर परिषदेत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय अनिश्चिततेला सोमवारी पूर्णविराम मिळाला. उपनगराध्यक्षा शैलेजा नारखेडे यांनी प्रभारी नगराध्यक्ष म्हणून अधिकृतपणे पदभार स्वीकारत पालिकेची सूत्रे हाती घेतली. नगराध्यक्षा गायत्री गौर भंगाळे यांचे जातप्रमाणपत्र अवैध ठरल्यानंतर राज्य शासनाने त्यांची निवड रद्द केल्याने हे पद रिक्त झाले होते.

सोमवारी पदभार स्वीकारण्यापूर्वी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला. नारखेडे यांनी नगरसेवकांसह महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून पदभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी पालिकेच्या विविध विभागांचा आढावा घेत प्रशासकीय कामकाजाला गती देण्याच्या सूचना दिल्या.
शहरातील १२ दिवसांआड होणारा पाणीपुरवठा तसेच स्वच्छतेच्या प्रश्नावर तातडीने उपाययोजना करण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
नगरपालिका नियमावलीनुसार नगराध्यक्ष पद रिक्त झाल्यास किंवा अपात्रता आल्यास उपनगराध्यक्षांकडे प्रभारी पदाची जबाबदारी सोपविण्याची तरतूद आहे. त्यानुसारच शैलेजा नारखेडे यांनी पदभार स्वीकारल्याची माहिती भाजप गटनेते युवराज लोणारी यांनी दिली.


