भुसावळ (प्रतिनिधी ) -: गेल्या काही दिवसांपासून कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे श्वास कोंडलेल्या भुसावळ शहराला अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री तथा आमदार संजय सावकारे यांच्या तातडीच्या हस्तक्षेपामुळे ठप्प झालेली कचरा संकलन व्यवस्था पुन्हा सुरू झाली असून, पुढील ७२ तासांत संपूर्ण शहर चकाचक करण्याचा निर्धार भाजपने व्यक्त केला आहे. नगरपरिषदेने थकीत देयके न दिल्याने पेट्रोल पंप चालकाने डिझेल पुरवठा रोखला होता. परिणामी घंटागाड्या डेपोतच उभ्या राहिल्या आणि शहरात कचऱ्याचे साम्राज्य पसरून रोगराईचा धोका निर्माण झाला होता. या गंभीर परिस्थितीची दखल घेत भाजप नगरसेवकांनी मंत्री सावकारे यांची भेट घेतली. सावकारे यांनी तत्काळ मध्यस्थी करत डिझेल पुरवठा सुरू करण्यास भाग पाडल्याने आज रात्रीपासूनच व्यापक स्वच्छता मोहिमेला सुरुवात होत आहे. भाजपतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत नगरसेवक पिंटू कोठारी आणि महेंद्रसिंग ठाकूर यांनी सत्ताधाऱ्यांवर कडाडून टीका केली. “माझी वसुंधरा योजनेत गौरव मिळवलेले शहर सत्ताधाऱ्यांच्या अकार्यक्षमतेमुळे कचराकुंडी बनले आहे,” असा आरोप त्यांनी केला. २०१६ नंतर भाजपने उभी केलेली सक्षम स्वच्छता यंत्रणा गेल्या काही महिन्यांत पूर्णपणे कोलमडल्याचे त्यांनी नमूद केले.

प्रशासकीय ‘व्हॅक्युम’ आणि राजकीय संघर्ष
नगराध्यक्षांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने निर्माण झालेली अस्थिरता, उपनगराध्यक्षांकडे पदभार सोपवण्यास होणारा विलंब आणि मुख्याधिकाऱ्यांची रजा, यामुळे भुसावळचे प्रशासन सैरभैर झाले असल्याचा आरोप भाजपने केला आहे. नगरसेवक राजेंद्र आवटे यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून जुन्या ठेकेदाराला पुन्हा कामावर बोलावल्याचे सांगितले, ज्यामुळे येत्या काही दिवसांत शहराचा चेहरामोहरा बदलणार आहे.
७२ तासांचा ‘मिशन मोड’
आज रात्रीपासून शहरातील कानाकोपऱ्यातील कचरा उचलण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाणार आहे. ७२ तासांत संपूर्ण शहर कचरामुक्त करण्यासाठी यंत्रणा सज्ज झाली असून, भाजपने या मोहिमेवर लक्ष केंद्रित केले आहे. यावेळी उपनगराध्यक्षा शैलैजा नारखेडे, शहराध्यक्ष संदीप सुरवाडे, गिरीश महाजन, प्राची पाटील, महेंद्रसिंग ठाकूर, पिंटू कोठारी, राजेंद्र आवटे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.


