तप्त उन्हात पक्ष्यांची तृष्णा भागवण्यासाठी ताप्ती पब्लिक स्कूलचा स्तुत्य उपक्रम; जीव दया जल सेवा अभियान’ संपन्न ;

भुसावळ (प्रतिनिधी) – सध्या भुसावळ शहराचा पारा ४५ अंशांच्या पुढे गेल्याने नागरिक उन्हाने लाहि लाहि होत आहे. या तीव्र उन्हाचा फटका मुक्या पशु-पक्ष्यांनाही बसत असून,पाण्यासाठी त्यांची प्रचंड वणवण होत आहे. हीच गरज ओळखून येथील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ‘जीव दया जल सेवा’ अभियान राबवून माणुसकीचे दर्शन घडवले आहे.

शाळेच्या आवारात मातीची भांडी

या उपक्रमांतर्गत शाळेच्या प्राचार्या नीना कटलर, उपप्राचार्या मनप्रीत कौर अरोडा,श्रद्धाली घुले यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक व विद्यार्थ्यांनी शाळेच्या गच्चीवर आणि परिसरातील झाडांवर व झाडाखाली मातीची भांडी ठेवली आहेत. या भांड्यांमध्ये दररोज स्वच्छ पाणी भरले जाणार असून, पक्ष्यांना पिण्यासाठी आणि आंघोळीसाठी या पाणवठ्यांची’ उत्तम सोय करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

शाळेतील ९ वीच्या विद्यार्थ्यांनी या मोहिमेत पुढाकार घेतला आहे. शाळेतील पर्यावरण मंडळाच्या सदस्यांनी दररोज या भांड्यांमधील पाणी बदलण्याची आणि ती स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आनंदाने स्वीकारली आहे.

मुक्या जीवांवर दया करणे हीच खरी मानवता – नीना कटलर.

यावेळी मार्गदर्शन करताना प्राचार्या नीना कटलर म्हणाल्या की,मुक्या प्राण्यांवर आणि पक्ष्यांवर दया करणे हीच खरी माणुसकी आहे. उन्हाळ्याच्या या कठीण काळात आपण सर्वांनी निसर्गाचे रक्षण केले पाहिजे. त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या घराच्या गॅलरीत किंवा अंगणात तसेच झाडावर किमान एक भांडे पाणी ठेवण्याचे आवाहनही केले. या उपक्रमासाठी व्हॉईसप्रिंसिपल श्रद्धाली घुले,मनप्रीत कौर,मुकेश कोळी,आकाश परदेशी,डॅनियल पवार,महेंद्र सूर्यवंशी,सोनाली मुजुमदार आणि हर्षला पाटील या शिक्षकांचेही मोलाचे सहकार्य लाभले. ताप्ती स्कूलच्या विद्यार्यांचे या उपक्रमाचे शहरात कौतुक होत आहे.

फोटो ओळ – निसर्गाची सेवा, हीच खरी ईश्वर सेवा, ताप्ती पब्लिक स्कूलचे विद्यार्थी उन्हाच्या कडाक्यात तहानलेल्या पक्ष्यांसाठी स्वच्छ पाण्याची सोय करताना सोबत प्रिंसिपल निना कटलर व व्हाईसप्रिंसिपल श्रद्धाली घुले.