भुसावळ – जळगाव जिल्यातील धरणगाव तालुक्यातील वराड गावाजवळ आज बुधवारी सकाळी एका भीषण अपघाताने खळबळ उडाली आहे. वापी (गुजरात) येथून अकोल्याकडे जाणाऱ्या क्रूझर गाडीचे चाक चालत्या गाडीतून निखळल्याने गाडी उलटली. या हृदयद्रावक घटनेत नववधूसह तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.

अकोला येथील रहिवासी पूजा रवी वागडकर (वय २२) हिचा विवाह नुकताच गुजरात राज्यातील वापी येथे संपन्न झाला होता. लग्नानंतर पहिल्यांदाच ती आपल्या नातेवाईकांसह माहेरी अकोल्याला परतत होती. संपूर्ण कुटुंबात आनंदाचे वातावरण होते, मात्र नियतीला काही वेगळेच मान्य होते. बुधवारी २८ एप्रिल रोजी सकाळी ही क्रूझर गाडी (क्रमांक MH 30 AZ 4710) धरणगाव तालुक्यातील वराड गावाजवळून जात असताना अचानक गाडीचे एक चाक निखळले. वेग जास्त असल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि गाडीचा भीषण अपघात झाला.
अपघातात नववधू पूजा रवी वागडकर, दत्तू तुळशीराम भागवत (वय ४२) आणि जगदीश चंद्रभान वागडकर (वय ५२) या तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. एका क्षणात लग्नाच्या आनंदाचे रूपांतर शोकात झाले असून वागडकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे
.या अपघातात गाडीतील अन्य ६ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये प्रेम भारत वाकडकर (वय २४), नितेश सुरेश काठोडे (वय ३५), अमोल दामोदर गीते (वय ३५), रवी प्रभाकर वाघोडकर (वय ३२), तुळशीराम भीमराव भागवत (वय ६७) आणि १४ वर्षीय बालक अंश नितेश काठोडे यांचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. जखमींना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


