नाशिक जिल्ह्यात पुन्हा एका भोंदूबाबाचा पर्दाफाश; महिलेचे लैंगिक शोषण प्रकरण उघड

नाशिक – नाशिक जिल्ह्यात महिलांच्या लैंगिक शोषणाच्या घटना एकामागून एक समोर येत असून समाजात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. नाशिक येथे भोंदू अशोक खरात प्रकरण, एरंडे आणि टीसीएस प्रकरण ताजे असतानाच आता निफाड तालुक्यातील धरणगाव येथील आणखी एका भोंदूबाबाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. महेशगिरी महाराज उर्फ महेश दिलीप काकडे याच्याविरुद्ध लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला कौटुंबिक अडचणींमुळे त्रस्त होती. घरगुती ताणतणाव तसेच मुलीच्या लग्नात अडथळे येत असल्याने उपाय शोधण्यासाठी ती धरणगाव येथील महेशगिरी महाराजाच्या मठात गेली होती. यावेळी आरोपीने महिलेला ‘बाहेरील बाधा’ असल्याचे सांगत तिच्या मनात भीती निर्माण केली. धार्मिक विधीच्या नावाखाली तिला पापनाशक कुंडात स्नान करण्यास सांगितले तसेच ओल्या कपड्यांत उंबराच्या झाडाभोवती फेऱ्या मारण्यास भाग पाडले.

यानंतर काही दिवसांनी आरोपीने पीडितेचा मोबाईल क्रमांक मिळवून व्हॉट्सअॅपवर अश्लील संदेश पाठवण्यास सुरुवात केली. ‘दैवी विधी’साठी एकांतात येण्याचे सांगून त्याने महिलेला नाशिक-त्र्यंबक रोडवरील एका लॉजवर बोलावले. तिथे ‘माझ्यात दैवी शक्ती आहे, कोणी काही करू शकत नाही’ अशी धमकी देत तिच्यावर अत्याचार केला. तसेच तिचे आक्षेपार्ह फोटो काढून तिला धमकावले.

भीतीमुळे पीडिता काही काळ गप्प राहिली. मात्र नंतर धैर्य एकवटत तिने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. समितीच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकार नाशिक ग्रामीण पोलिसांच्या निदर्शनास आणून देण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.

या प्रकरणानंतर पोलिसांनी तपासाची गती वाढवली असून आरोपीने इतर महिलांनाही अशाच प्रकारे फसवले आहे का, याची चौकशी सुरू आहे. तसेच या भोंदूबाबाला मदत करणाऱ्यांवरही कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.