भुसावळ( प्रतिनिधी ) - शहराच्या विकासाच्या मुद्द्यांवरून भुसावळ नगरपालिकेची साधारण सभा पुन्हा एकदा गदारोळात तहकूब करण्यात आली. आधीच वादग्रस्त ठरलेली ही सभा आज (मंगळवार) पुन्हा घेण्यात आली होती; मात्र सत्ताधारी आणि विरोधकांतील तीव्र वादामुळे अखेर सभा २३ मार्चपर्यंत पुढे ढकलावी लागली. सभेला सुरुवात होताच वातावरण तापले. भाजपा पदाधिकाऱ्यांनी नगराध्यक्षांना निवेदन देण्याचा प्रयत्न केला; परंतु सत्ताधारी नगरसेविकांनी त्याला विरोध दर्शवल्याने आधी महिलांमध्ये, त्यानंतर पुरुष नगरसेवकांमध्ये तीव्र शाब्दिक चकमक झाली. काही क्षणांतच हा वाद उग्र रूप धारण करत दोन्ही गट समोरासमोर आले आणि सभागृहात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची चिन्हे दिसताच नगराध्यक्षा गायत्री भंगाळे व माजी आमदार संतोष चौधरी यांनी सभागृह सोडले. त्यानंतर सत्ताधारी गटातील सदस्यही बाहेर पडले आणि सभा तहकूब करण्याचा निर्णय घेण्यात आला. या सभेच्या अजेंड्यावर तब्बल 341 विषय होते. यात शहरातील बंद पडलेली सिग्नल यंत्रणा सुरू करणे, पालिकेच्या इमारतीवर नाट्यगृह उभारणे, नवीन स्कॉर्पिओ वाहन खरेदी, पुतळ्यांवर सीसीटीव्ही बसवणे, पाणीटंचाई उपाययोजना, वातानुकूलित स्वच्छतागृहे उभारणे, प्रवेशद्वारे बांधणे, जामनेर रोडवरील स्वच्छतागृहे आदी विकासकामांचा समावेश आहे.फेब्रुवारी 2026 मधील बैठकीच्या कार्यवृत्ताला मंजुरी देण्याच्या मुद्द्यावरून हा वाद निर्माण झाल्याचे समोर आले आहे. भाजपाने त्या बैठकीतील काही विषयांना लेखी विरोध दर्शवला असून ते कार्यवृत्त मंजूर करू नये, अशी भूमिका घेतली आहे. यासाठी ते निवेदन देण्यावर ठाम आहेत; मात्र प्रशासनाकडून ते स्वीकारले जात नसल्याने वाद चिघळत आहे. 13 मार्चनंतर 17 मार्चची सभा देखील तहकूब झाल्याने आता 23 मार्च रोजी तिसऱ्यांदा बैठक होणार आहे. एकाच सभेला तिसऱ्यांदा बोलावण्याची वेळ येणे हा पालिकेच्या इतिहासातील पहिलाच प्रकार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, संभाव्य गोंधळ लक्षात घेता पोलिस प्रशासनाने नगरपालिकेच्या परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. संपूर्ण परिसराला छावणीचे स्वरूप देण्यात आले होते. . सभागृहात माध्यम प्रतिनिधींना प्रवेश नाकारल्याने पत्रकारानी तीव्रनाराजी व्यक्त केली आहे. हा प्रकार लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर आघात असल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे.. या प्रकारामुळे प्रशासनावर पारदर्शकतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शहराच्या विकासाशी निगडित महत्त्वाचे प्रश्न प्रलंबित असताना पुन्हा एकदा सभा तहकूब झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. २३ मार्च रोजी होणारी पुढील सभा आता निर्णायक ठरणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



