भुसावळ(प्रतिनिधी| )भुसावळ शहरातील माहिती अधिकार कार्यकर्ते केदार वामन सानप यांच्याविरोधात 40 वर्षीय महिलेचा पाठलाग करून विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित महिला कुटुंबासह वास्तव्यास असून तिने दिलेल्या तक्रारीनुसार, 29 डिसेंबर रोजी दुपारी कामानिमित्त मोठ्या मुलासोबत तहसील कार्यालयाकडे जात असताना यावल रोड परिसरात संशयित केदार सानप (रा. रानातला महादेव, हुडको कॉलनी, भुसावळ) यांनी तिचा पाठलाग केला. यावेळी महिलेकडे वाईट नजरेने पाहत अश्लील हावभाव व इशारे केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकारामुळे आपण भयभीत झाल्याचेही तिने नमूद केले आहे.

तसेच यापूर्वी दाखल असलेले गुन्हे मागे घेण्यासाठी संशयिताकडून दबाव टाकण्यात येत असल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
दरम्यान, केदारनाथ (केदार) सानप यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावत हे प्रकरण राजकीय दबावातून व द्वेषातून उभे करण्यात आल्याचा दावा केला आहे. सानप यांच्या म्हणण्यानुसार, 29 डिसेंबर रोजी प्रथम एनसी दाखल करण्यात आली व त्यानंतर 30 डिसेंबर रोजी एफआयआर क्रमांक 305 अन्वये विनयभंगासारखा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला.
मी अनेक वर्षांपासून सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून काम करत असून, शासनाच्या नुकसानास कारणीभूत ठरणाऱ्या बाबींविरोधात वरिष्ठ कार्यालयांकडे तक्रारी दाखल करत असतो. त्यामुळेच माझी सामाजिक प्रतिमा मलीन करण्यासाठी हा खोटा प्रकार करण्यात आला असल्याचा आरोप सानप यांनी केला आहे. संबंधित महिला मला ओळखतही नाही, असा दावाही त्यांनी केला आहे.
सानप यांनी सांगितले की, ज्या दिवशी गुन्हा दाखल झाला त्या दिवशी सकाळी 11.15 ते 12 वाजेपर्यंत ते तहसील कार्यालयात माहिती अधिकाराच्या सुनावणीसाठी उपस्थित होते. याआधीही संबंधित महिलेने माझ्यासह माझ्या मुलाविरोधात खोट्या तक्रारी दाखल केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
या प्रकरणात न्याय मिळावा यासाठी मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस महासंचालक, पोलीस अधीक्षक व पोलीस उपअधीक्षक यांच्याकडे निवेदन देणार असल्याचेही केदार सानप यांनी स्पष्ट केले आहे.


