जळगाव( प्रतिनिधी )-
जुन्या भांडणाचा राग मनात धरून संधी साधत मित्राचाच गळा आवळून खून करून मृतदेह धरणात फेकल्याची धक्कादायक घटना जळगाव तालुक्यातील शिरसोली परिसरात उघडकीस आली आहे. जामनेर येथील चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा खून झाल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले असून या प्रकरणी दोघा मित्रांना अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

खून झालेल्या तरुणाचे नाव निलेश राजेंद्र कासार (वय ३०, रा. दत्त चैतन्य नगर, जामनेर) असे आहे. निलेश हा आई-वडील व बहिणीसोबत राहत असून जळगाव शहरातील एलटीआय फायनान्स कंपनीत कार्यरत होता. सोमवार, १५ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजेपासून तो बेपत्ता झाल्याची तक्रार जामनेर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.
पोलिस तपासात निलेशसोबत काम करणारे भूषण बाळू पाटील (वय २०, रा. पिंपरी, ता. चोपडा) आणि दिनेश चौधरी (वय २०, रा. तळई, ता. एरंडोल) हे दोघेही संशयाच्या भोवऱ्यात सापडले. हे दोघे सध्या जळगाव तालुक्यातील शिरसोली येथे वास्तव्यास होते.
काही महिन्यांपूर्वी किरकोळ कारणावरून निलेश व भूषण यांच्यात वाद झाला होता. त्या वादाचा राग भूषणने मनात धरून ठेवला होता. दरम्यान, फायनान्सशी संबंधित एका प्रकरणाच्या चर्चेच्या बहाण्याने भूषणने निलेशला शिरसोली येथे बोलावले. चर्चेदरम्यान वाद वाढल्यानंतर भूषण पाटील व दिनेश चौधरी यांनी शिरसोली गावाजवळील शेतात निलेशचा दोरीने गळा आवळून खून केला. त्यानंतर मृतदेह पोत्यात बांधून नेव्हरे धरणात फेकून दिला.
निलेश बेपत्ता असल्याने पोलीस व नातेवाईक त्याचा शोध घेत होते. दरम्यान, त्याची दुचाकी रामदेववाडी गावाजवळ आढळून आली. एमआयडीसी पोलीस स्टेशनचे निरीक्षक बबन आव्हाड यांच्या पथकाने मोबाईल कॉल डिटेल्स व तांत्रिक तपास सुरू केला. चौकशीदरम्यान संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिली.
शुक्रवार, १९ डिसेंबर रोजी सकाळी नेव्हरे धरणातून निलेशचा मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाठविण्यात आला. घटनास्थळी पंचनामा करण्यात आला.
या वेळी उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल वाघ यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते. एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास चालू आहे.
दरम्यान, रुग्णालयात निलेशच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला असून जिल्ह्यात पुन्हा एकदा खुनाची घटना उघडकीस आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


