अभ्यास हा भार नसून ताकद आहे – समुपदेशक आरती चौधरी : अभ्यासाची भीती घालवण्यासाठी के नारखेडे विद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन :

भुसावळ (प्रतिनिधी) — आजच्या स्पर्धात्मक युगात प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात असणारी अभ्यासाची भीती व कंटाळा कसा दूर करावा, तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीकोनातून समुपदेशक सौ. आरती चौधरी यांनी के नारखेडे विद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अवघ्या ३० मिनिटांच्या या सत्रात अभ्यासातील भीती कुठून येते, ती कशी कमी करायची, अभ्यासात गोडी कशी निर्माण करायची आणि शिकलेले दीर्घकाळ कसे लक्षात ठेवायचे, यावर त्यांनी सोप्या उदाहरणांतून मार्गदर्शन केले. यावेळी मार्गदर्शक व्याख्यान संपन्न झाले. मुख्याध्यापिका श्रीमती संगीता अडकमोल यांनी त्यांचे स्वागत करून सत्कार केला.

अभ्यासाची भीती ही प्रामुख्याने “मला जमत नाही” हा गैरसमज, इतरांशी होणारी तुलना आणि चुकीच्या पद्धतीने अभ्यास केल्यामुळे निर्माण होते, असे त्यांनी सांगितले. पुस्तक उघडून तासन्‌तास बसणे म्हणजे अभ्यास नव्हे, तर मेंदूला समजून काम करायला लावणे म्हणजे खरा अभ्यास असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अभ्यासातील कंटाळा घालवण्यासाठी त्यांनी मोठे धडे छोटे तुकडे करून अभ्यास करणे, “५ मिनिट नियम” वापरणे, चुका स्वीकारणे आणि परीक्षेला भीती न मानता खेळासारखे पाहणे, असे उपाय सुचवले. तसेच अभ्यास जीवनाशी जोडल्यास तो अधिक रंजक होतो, असे सांगत गणित, विज्ञान व भूगोलातील उदाहरणे त्यांनी दिली.

शिकलेले लक्षात ठेवण्यासाठी कथा तंत्र, Teach Back Method, ३R पद्धत (Read–Recite–Revise), Mind Map आणि 20-20-20 नियम यांसारखी ठोस तंत्रे त्यांनी समजावून सांगितली. भीती कमी झाली की क्षमता आपोआप उघडते, हे एका विद्यार्थ्याच्या उदाहरणातून त्यांनी स्पष्ट केले.

शेवटी विद्यार्थ्यांना उद्देशून बोलताना त्यांनी सांगितले की, आयुष्यात यश मिळवण्यासाठी मोठ्या बदलांपेक्षा रोज सातत्याने होणारे छोटे बदल अधिक उपयुक्त ठरतात. अभ्यास हा भार नसून ताकद आहे. ध्यास व अभ्यास यांना पर्याय नाही. “उद्यापासून करू” हे वाक्य टाळून आजपासूनच सुरुवात करा, असा संदेश त्यांनी दिला.विद्यार्थ्यांशी संवादात्मक पद्धतीने प्रश्नोत्तरे घेतल्यामुळे कार्यक्रम अधिक रंजक झाला. विद्यार्थ्यांनी आपल्या समस्या शंका, प्रश्न व अनुभव मांडले, तर अनेक शंकांचे व समस्यांचे निरसन यावेळी करण्यात आले.

या मार्गदर्शन सत्रामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढून अभ्यासाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक झाल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. व्याख्यात्यांचा परिचय शैलेंद्र वासकर सर यांनी करून दिला तर पर्यवेक्षक एस. पी. पाठक यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शैलेंद्र वासकर , शैलेंद्र महाजन, संदीप पाटील, व्ही. एस. राणे, निळकंठ खाचणे, नवीन नेमाडे सर यांनी विशेष परिश्रम घेतले.