जळगाव (प्रतिनिधी) – तिबेटमधील बौद्ध धर्मावर चीनच्या कम्युनिस्ट सरकारने केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ दलाई लामांनी १९५० पासून अहिंसेच्या मार्गाने चीनविरोधात शांततापूर्ण लढा सुरू ठेवला आहे. १९५९ मध्ये चीनने अत्यंत आक्रमक लष्करी कारवाई करून त्यांचा आंदोलनाचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला, तरीही दलाई लामांनी हिंसेचा मार्ग न स्वीकारता शांततेचा पुरस्कार केला, यामुळे ते जगातील शांततेचे दूत ठरले, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक जयसिंग वाघ यांनी केले.

१० डिसेंबर रोजी जी. एस. मैदानावर तिबेटी जनतेतर्फे आयोजित कार्यक्रमात वाघ बोलत होते. त्यांनी पुढे सांगितले की, दलाई लामा हे तिबेटी बौद्ध धर्मियांचे आध्यात्मिक गुरूच नव्हे, तर राजकीय मार्गदर्शकही आहेत. तिबेटमध्ये राजकीय लोकशाहीचा पाया रचणे, बौद्ध संस्कृती व इतिहास अबाधित ठेवणे आणि जगात शांततेचा संदेश पसरवणे हे त्यांचे प्रमुख उद्दिष्ट आहे. १९६९ पासून ते विविध देशांच्या प्रमुखांना भेटून तिबेटी संघर्षाची माहिती देत आहेत. त्यांच्या शांततेच्या कार्याची दखल घेऊन १० डिसेंबर १९८९ रोजी त्यांना नोबेल शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस भगवान बुद्ध व तारादेवीची विश्वपूजा करून त्रिसरण व पंचशील ग्रहण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष रोविन यांनी शांततेसाठी मंत्रोच्चार करत दलाई लामांच्या नोबेल दिनाचा तिबेटी समुदाय आनंदाने उत्सव म्हणून साजरा करतो, असे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप सपकाळे व शिरींग यांनी केले. प्रास्ताविक फुरबू, स्वागत सेवांग व छाबा यांनी केले. आभार प्रदर्शन टेंजिन यांनी तिबेटी भाषेत, तर मराठीत कवितेद्वारे सपकाळे यांनी केले. प्रा. सरोजिनी लभाने, तेस्वांग व फुरबा यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाला नंदवोल, चोकी, यांगिनी, फुर्भा ल्हामो, ट्सेविंग योंडन, तेस्तान, चीमे, जम्पा, सुनंदा वाघ, गीता सोनवणे, सुमन बैसाणे, सुषमा भालेराव, निखिल रांजनकर, अजय पाटील, छांभा यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. शेवटी तिबेटी व मराठी गाण्यांवर मनमोहक नृत्य सादर झाले तसेच उपस्थितांना मिठाईचे वाटप करण्यात आले. उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.


