भुसावळ विभागात पुढील १२ दिवस कडाक्याची थंडी ;जळगाव जिल्ह्यात तापमान ९.४° सेल्सिअस पर्यंत घसरण्याचा अंदाज

भुसावळ (प्रतिनिधी ) – डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू झालेली थंडी पुन्हा तीव्र होण्याची शक्यता असून पुढील तब्बल १२ दिवस म्हणजे १९ डिसेंबरपर्यंत थंडीचा जोर कायम राहणार आहे. मुंबई आणि कोकण वगळता संपूर्ण महाराष्ट्रात, विशेषतः उत्तर महाराष्ट्रातील खानदेशात, रात्री कडाक्याची थंडी आणि दिवसा देखील हुडहुडी जाणवेल.

हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार जळगाव जिल्ह्याचे तापमान ९.४ अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरण्याची शक्यता आहे. उत्तर भारतातून सतत येणारे थंड ईशान्य वारे आणि हवेमधील स्थिर १०१६ हेक्टापास्कल दाब यामुळे थंडी टिकून राहणार असल्याचे संकेत आहेत.

दरम्यान, उत्तर भारतातून येणाऱ्या थंडीला आडवा येण्याची कोणतीही शक्यता नसून एकापाठोपाठ येणाऱ्या पश्चिमी प्रकोपांमुळे ईशान्येकडील थंड वारे अजून वेगाने महाराष्ट्राकडे झेपावत आहेत. त्यामुळे राज्यात, विशेषतः खानदेशात, थंडी आणखी वाढण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

नागरिकांनी रात्री बाहेर पडताना योग्य उबदारीची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.