जळगाव जिल्ह्यात निवडणूक काळात जमावबंदी लागू01 ते 03 डिसेंबर दरम्यान पाचपेक्षा अधिक व्यक्तींच्या जमावावर बंदी :

भुसावळ (प्रतिनिधी ) : आगामी नगर परिषद / नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जळगाव जिल्ह्यात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. सह आयुक्त, न.वि. शाखा यांच्या पत्रानुसार जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी भारतीय नागरी सुरक्षा संहिता 2023 मधील कलम 163 अन्वये हा आदेश जारी केला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, मतदानपूर्व आदल्या दिवसापासून म्हणजे 01 डिसेंबर 2025 रोजी रात्री 10.05 वाजल्यापासून, तर मतदान संपल्यानंतरच्या एका दिवसापर्यंत म्हणजे 03 डिसेंबर 2025 रोजी रात्री 12.00 वाजेपर्यंत जिल्ह्यात पाचपेक्षा अधिक व्यक्तींचा जमाव जमणे किंवा एकत्रित वावरणे यावर बंदी राहणार आहे.

जिल्हाधिकारी यांनी नमूद केले की, निवडणुकीचे वातावरण शांततेत, निर्भय व न्याय्य रीतीने पार पडावे, तसेच किरकोळ कारणावरून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ही उपाययोजना आवश्यक आहे. तातडीची परिस्थिती असल्याने कलम 163 (2) नुसार संबंधितांना ऐकून घेणे शक्य नसल्याने आदेश एकतर्फी जारी करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

ही जमावबंदी निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना लागू राहणार नाही.

सदर आदेश 01 डिसेंबर रोजी रात्री 10.05 वाजेपासून 03 डिसेंबर रोजी रात्री 12.00 वाजेपर्यंत अंमलात राहणार असून नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.