उज्वला बागुल । भुसावळ
भुसावळ तालुक्यात वरणगाव ही एकमेव नगरपालिका आहे. इथलं राजकारण रंजक वळणावर आलं आहे. त्याचं मुख्य कारण म्हणजे मागच्या नगराध्यक्ष निवडणुकीत पडद्याआड झालेल्या घडामोडी. तेव्हा त्या तशा अंधारात (गुप्त) घडल्या होत्या. आता तर त्या उजेडात अर्थात चव्हाट्यावर आल्या आहेत. तेव्हा भाजपचे सुनील काळे हे आमदार एकनाथ खडसे यांचे निकटवर्तीय सुधाकर जावळेंचा धक्कादायक पराभव करून नगराध्यक्ष झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते राजेंद्र विश्वनाथ चौधरी यांची त्यांना खंबीर साथ मिळाली होती. तेव्हा ज्या नाट्यमय घडामोडी झाल्या होत्या. भुसावळचे माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरी हे किंगमेकर ठरले होते. मात्र, या घडामोडी ठरत असताना ‘भाजप आमदार संजय सावकारे यांनी आपल्याला नगराध्यक्ष करण्याचं आवतनं स्वतः दिलं होतं.’ असा गौप्यस्फोट सोशल मीडियावर व्हिडिओतून केला आहे. त्यामुळे आता स्वर्गीय सुधाकर जावळे समर्थकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

राजेंद्र चौधरींची सुनील काळेंना भावनिक साद
सोशल मीडियावर राजेंद्र चौधरी यांनी व्हिडिओ जारी केला आहे. त्यात त्यांनी आपण भाजपचे सुनील काळे यांना कशी मदत केली होती ते परखडपणे मांडले आहे. त्या राजकीय घडामोडीत कुणी काय पत्ते व डाव टाकले होते हे सर्व सांगून टाकले आहे. अनेक रंजक गोष्टींचा उलगडा त्यांनी केला आहे. तो करत असताना त्यांनी आपण जशी खंबीर साथ दिली होती तशी सुनील काळे यांनी निर्व्याज भावनेतून समर्थ साथ द्यावी. किंबहुना, नगराध्यक्ष पदासाठी दाखल अर्ज मागे घ्यावा अशी माफक अपेक्षा व्यक्त केली आहे.
आता अनिल चौधरी टाकणार डाव
वरणगाव येथे नगराध्यक्ष पदाची मागणी जी निवडणूक झाली होती, त्यात अनिल चौधरी हेच सुनील काळे यांच्या विजयाचे मुख्य सूत्रधार होते. राजेंद्र चौधरी हे डगमगणार नाहीत असा शब्द त्यांनी सुनील काळे यांना दिला होता. किंबहुना दिलेला शब्द पाळला होता. अर्थात, काळे यांच्यावर त्याचं हे राजकीय ऋण आहे. अर्थात, अनिल चौधरी हे बंधू समान असलेले राजेंद्र चौधरी यांच्यासाठी मतविभागणी होऊ नये म्हणून सुनील काळे यांना माघार घेण्यासाठी प्रवृत्त (तयार) करू शकतात. तसं झालं तर काळे यांनी केलेली ही परतफेड असेल.
नगराध्यक्ष पदासाठी चौरंगी लढत
भाजपच्या श्यामल झांबरे, भाजप बंडखोर सुनील काळे, शिवसेना शिंदे गटाच्या तृप्ता महाजन, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे राजेंद्र विश्वनाथ चौधरी अशी चौरंगी लढत होईल असे सध्याचे चित्र आहे. मात्र काही राजकीय तडजोड झाली तर माघारीनंतर लढत तिरंगी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसं झालं तर मात्र भाजप समोर मोठं आव्हान उभं राहिलं. भाजप बंडखोर सुनील काळे यांनी केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनीच आपली भाजपकडून मिळणारी उमेदवारी कापली असा आरोप केला आहे. हाच मुद्दा घेऊन त्यांनी वातावरण तापवले आहे.


