भुसावळ पालिका निवडणूक : पहिल्या दिवशी एकही अर्ज नाही -15 नोव्हेंबर नंतर निवडणुकीची रंगत वाढणार

भुसावळ (प्रतिनिधी) : भुसावळ नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सोमवार, 10 नोव्हेंबरपासून सुरू झाली आहे मात्र पहिल्याच दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत अर्ज स्वीकारण्याची वेळ निश्चित करण्यात आली परंतु या चार तासांच्या कालावधीत प्रांताधिकारी कार्यालय परिसरात निवडणुकीसंदर्भातील कोणतीही हालचाल दिसून आली नाही.

कर्मचार्‍यांचा चोख बंदोबस्त
प्रांताधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. निवडणुकीशी संबंधित व्यक्तींनाच आत प्रवेश दिला जात होता. प्रवेशद्वारावर उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींची ओळख पटवूनच प्रवेश दिला जात असल्याने कार्यालय परिसरात संपूर्ण शिस्तबद्ध वातावरण होते. तथापि, एकही उमेदवार अर्ज दाखल करण्यासाठी न आल्याने दिवसभर परिसरात शांतता होती.

25 प्रभागातून 50 नगरसेवक निवडून येणार
या निवडणुकीत शहरातील 25 प्रभागातून 50 नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत. त्याचबरोबर एक लोकनियुक्त नगराध्यक्षही थेट जनतेतून निवडला जाणार असल्याने या निवडणुकीत प्रचंड चुरस निर्माण होणार आहे. कोणत्या वार्डातून कोण उमेदवारी दाखल करतो, कोणते नवीन चेहरे राजकारणात उतरतात आणि जुन्या नगरसेवकांची पुनरागमन होते का, याकडे मतदार आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

यंदा उमेदवारी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याने अनेक इच्छुक उमेदवारांना अर्ज भरण्याची पद्धत, आवश्यक कागदपत्रे, वेबसाइटवरील तांत्रिक प्रक्रिया याबाबत अडचणी येत आहेत त्यामुळे पहिल्याच दिवशी कोणताही अर्ज सादर झाला नाही.

निवडणुकीचे निर्णय अधिकारी म्हणून प्रांताधिकारी जितेंद्र पाटील आहेत. सहाय्यक निर्णय अधिकारी म्हणून भुसावळ नगरपालिकेचे मुख्याधिकारी राजेंद्र फातले आहेत. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख पुढील काही दिवसांवर येत असल्याने येत्या दोन दिवसांत अर्ज दाखल करण्याचा वेग वाढण्याची शक्यता आहे.

राजकीय पक्ष, संभाव्य उमेदवार आणि नागरिक या सर्वांच्याच नजरा आता पुढील दोन दिवसांवर खिळल्या आहेत. कोणत्या प्रभागातून कोण अर्ज दाखल करतो आणि कोणती नवी समीकरणे तयार होतात, याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे