मुक्ताईनगर (प्रतिनिधी ) : शेती वाटणीच्या वादातून मुलाने वडिलांना लाथा-बुक्क्यांनी व कुर्हाडीच्या दांड्याने बेदम मारहाण केल्याने वडिलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथे शनिवारी रात्री घडली. खुनाच्या घटनेमुळे अंतुर्ली परिसरात खळबळ उडाली.

रवींद्र रमेश तायडे (27, रा.इंदिरानगर, फुकटपुरा, अंतुर्ली) यांनी मुक्ताईनगर पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार रवींद्र यांचे चुलते जगदीश दामू तायडे (73) यांना त्यांचा मुलगा गणेश तायडे याने मारहाण करून त्यांचा मृत्यू घडवून आणला.
गणेश तायडे हा नियमितपणे दारू पिऊन घरी येत असे आणि त्याची आई व मोठ्या भावाशी भांडण करत असे. तायडे कुटुंबाची मूळ वारसा हक्काची अंदाजे तीन एकर जमीन रावेर तालुक्यातील आंदलवाडी येथे असून जी त्यांचे चुलते मधुकर तायडे कसतात. गणेश वारंवार आपले वडील जगदीश तायडे यांच्याकडे ती जमीन वाटून घेण्याची किंवा तिचा नफा (मुनाफा) मिळवण्याची मागणी करत होता.
1 नोव्हेंबर रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास गणेश कामावरून घरी आला आणि त्याचे आईशी भांडण झाले. आईने त्याला जेवण देऊन शेळ्या ठेवण्याच्या गोठ्यात जाण्यास सांगितले. रात्री 10 ते 10.30 वाजण्याच्या सुमारास गणेश पुन्हा गोठ्यातून घराकडे येत असताना त्याने चुलत भाऊ रवींद्र तायडे यांना मी बापाला मारले आहे आणि त्यांना विहिरीत टाकून देणार, असल्याचे सांगितलूे.
रवींद्र तायडे यांनी तत्काळ आपल्या मित्रांना (राहुल शिरतुरे, सागर गाडे, रोहित तायडे) सोबत घेऊन गोठ्यात धाव घेतली. तिथे जगदीश तायडे हे बाजेवर झोपलेले होते. त्यांची कांबळ काढली असता, त्यांचा चेहरा रक्ताने माखलेला होता तसेच त्यांचा डावा हात कोपरातून मोडलेला दिसत होता. त्यावेळी राहुल शिरतुरे यांनी मोबाईलवर व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू करून जगदीश तायडे यांना विचारणा केली असता, त्यांनी ‘मला गणेशने मारले आहे’ असे स्पष्ट सांगितले.
जखमी जगदीश तायडे यांना मोटारसायकलवरून नेता येणे शक्य नसल्याने तातडीने रुग्णवाहिका बोलावण्यात आली आणि त्यांना जळगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. रविवार, 2 नोव्हेंबर रोजी पहाटे पाच वाजता उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आरोपी गणेश तायडे याने वडिलांचा खून केल्याप्रकरणी त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला.


