अंजाळे येथे व्यसनमुक्ती मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

यावल (प्रतिनिधी ) – अंजाळे तालुका यावल येथे नुकताच विद्यार्थ्यांसाठी व्यसनमुक्ती मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न झाला.
या प्रसंगी नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य या संस्थेचे नाशिक विभागीय संघटक प्रमुख प्रा. डॉ. दयाघन एस. राणे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. कार्यक्रम प्रसंगी रोटरी क्लब ऑफ भुसावळ चे सदस्य रो. गजानन सेवलकर, संस्थेचे व्हाईस चेअरमन श्री मदनभाऊ सपकाळे, माजी चेअरमन तसेच संचालक श्री गिरीश पाटील सर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
आपल्या मार्गदर्शनपर भाषणात प्रा. डॉ. दयाघन राणे यांनी विद्यार्थ्यांना व्यसनाची व्याख्या, विद्यार्थीदशेत व्यसन लागण्याची करणे, व्यसनांचे प्रकार, त्यांचे शरीरावरील दुष्परिणाम आणि कुटुंब तसेच समाजावर होणारे परिणाम यांची विविध उदाहरणे देत माहिती दिली. आपल्याच परिसरातील व्यसनी झालेल्या आणि कर्करोगाने सर्वस्व नष्ट झालेल्या कुटुंबांचे उदाहरण देत विद्यार्थ्यांना सांगितले की ‘ठामपणे नाही म्हणायला शिका’ व्यसनमुक्त होण्यासाठी मनाचा तसेच मनाचा निर्धार पक्का असणे गरजेचे आहे. हे सांगत निर्धार पक्का असेल तर व्यसनावर मात कशी केली जाऊ शकते याचे उदाहरणे देऊन मार्गदर्शन केले. आणि तुमचे सध्याचे वय हे संवेदनशील असून या वयात मन विविध गोष्टींकडे आकर्षित होते. तेव्हा आपल्याला दिल्या जाणाऱ्या प्रलोभनाची नीट माहिती करून घ्या. आणि नकार द्यायला शिका असे आवाहन केले. त्या बरोबरच सध्याच्या काळातील समस्या ठरू पहात असलेल्या मोबाईल फोनच्या व्यसनांबद्दल माहिती देऊन त्याचे परिणामही विद्यार्थ्यांना विषद केलेत.


व्याख्यानाच्या स्वरूपातील मार्गदर्शन सत्र संपल्यावर विद्यार्थ्यांना नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयाने पुरवलेल्या व्यसनाच्या संदर्भातील विविध पोस्टरचे अवलोकन करायला दिले. त्यामधून विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे अमली पदार्थ, त्यांचे शरीरावर तसेच समाजावर होणारे दुष्परिणाम आणि त्यामधून काय बोध घ्यायचा याची माहिती मिळाली. आणखी काही प्रेरक बोधवाक्य आणि घोषवाक्ये यांची ही माहिती मिळून विद्यार्थ्यांचे प्रबोधन झाले. कार्यक्रम आपल्यावर झालेल्या अनौपचारिक चर्चेत विद्यार्थ्यांनी प्रा डॉ दयाघन राणे यांच्याशी संवाद साधला आणि व्यसनांबद्दल अधिक माहिती जाणून घेतली व भविष्यात आपण कोणत्याही प्रलोभनाला बळी पडणार नाहीत या बद्दल आश्वस्त केले.
कार्यक्रम प्रसंगी प्रमुख वक्ते प्रा डॉ दयाघन राणे यांचे स्वागत माजी चेअरमन श्री गिरीश पाटील सर यांनी तर इतर पाहुण्यांचे स्वागत नूतन विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका सौ. नीलिमा झोपे आणि त्यांचे सहकारी शिक्षक यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन उपशिक्षिका सौ. ज्योती परखड यांनी केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी नूतन विद्यामंदिर अंजाळे येथील शिक्षकवर्गाने परिश्रम घेतले.