सेऊल दक्षिण कोरिया येथे आंतरराष्ट्रीय राज्यशास्त्र परिषदे मध्ये प्रा डॉ सुनील नेवे यांचे शोधनिबंधाचे वाचन.


भुसावळ (प्रतिनिधी ) – सेऊल दक्षिण कोरिया येथे आंतरराष्ट्रीय राज्यशास्त्र परिषदे मध्ये प्रा डॉ सुनील नेवे यांचे शोधनिबंधाचे वाचन.
आंतरराष्ट्रीय राज्यशास्त्र परिषदेच्या वतीने सेऊल दक्षिण कोरिया येथे दिनांक 12 जुलै ते 16 जुलै 2025 या दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या पाच दिवसीय जागतिक परिषदे मधे सेकंडरी एज्युकेशन सोसायटी संचलित कला व विज्ञान महाविद्यालय भालोद येथील राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.सुनील नेवे यांनी “दक्षिण आशियातील राजकीय ध्रुवीकरण: सध्याच्या परिस्थितीत भारत पाकिस्तान आणि बांगलादेश चे तुलनात्मक विश्लेषण” या विषयावर शोधनिबंधाचे वाचन केले.

यावेळी या पॅनलचे समन्वयक डॉ. जोस व्हेरीसीमो रोमाव नेट्टो (सावू पोलो विद्यापीठ ब्राझील दक्षिण अमेरिका) डॉ. बेंजामिन गोल्डफ्रॅंक (सेटऑन हॉल विद्यापीठ उत्तर अमेरिका), डॉ.कारला डी पैवा बेझेरा (इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड इकॉनोमिक रिसर्च ब्राझील साऊथ अमेरिका) प्रो. गिसले क्रावेरो (ब्राझील दक्षिण अमेरिका)या होत्या. यावेळी डॉ. श्रीमती कारला यांनी प्रा. डॉ सुनील नेवे यांच्या शोधनिबंधावर आपले मत व्यक्त करताना त्या म्हणाल्या की,विषयाची निवड योग्य होती,तसेच मुद्देसूद शोधनिबंध चे वाचन केले,राजकीय ध्रुवीकरण कसे कमी करता येईल याविषयी मांडलेली प्रा.नेवे यांची मते समाजाला दिशादर्शक ठरतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.आणि प्रा.नेवे यांचे कौतुक केले.या शोधनिबंधातून प्रा.नेवे यांनी काढलेले निष्कर्ष पुढील प्रमाणे आहेत…
दक्षिण आशियातील राजकीय ध्रुवीकरण ही एक गुंतागुंतीची समस्या आहे, जी शासन, लोकशाही आणि प्रादेशिक स्थिरतेसाठी महत्त्वपूर्ण आव्हाने निर्माण करते.
राजकीय ध्रुवीकरण हे पक्षपाती माध्यमे,सोशल मीडियावरील नकारार्थी आणि खोट्या बातम्या,बदलते अस्थिर राजकारण आणि आर्थिक विषमता यामुळे वाढते आणि त्यामुळे सरकार चालवणे कठीण होत जाते लोकशाही मूल्यांचा ऱ्हास होत जातो लोकशाही वरील विश्वास कमी होत जातो सामान्य लोक निरोगी चर्चा करणे थांबवतात.
1947 मध्ये ब्रिटिश राजवटी पासून स्वातंत्र्य मिळाल्यापासून भारत राजकीय ध्रुवीकरणाच्या समस्येचा सामना करत आहे भारताचा सहभाग आणि विशेषतः हिंदू आणि मुस्लिमांमध्ये धार्मिक आधारावर पाकिस्तानची झालेली निर्मिती, भाषा ,प्रादेशिकता आणि जात यासारखे मुद्दे देखील भारतीय समाजात संघर्ष आणि विभाजनाचे स्त्रोत म्हणून उदयाला आले जे वारसाने राजकीय ध्रुवीकरणाकडे नेणारे आहेत. 1980 आणि 1990 च्या दशकात भाजपचा उदय आणि त्यांचा हिंदू राष्ट्रवादी अजेंडा भारतातील राजकीय ध्रुवीकरणाच्या इतिहासात एक महत्त्वाचा टप्पा ठरला.हिंदू अभिमान आणि अस्मितेवर भर देणाऱ्या भाजपाच्या राजकारणाच्या ब्रँडमुळे पक्षाला राष्ट्रीय पातळीवर निवडणुकीत यश मिळाले. भारतात फाळणी,जातीय विभाजन आणि प्रादेशिकता यांसारख्या ऐतिहासिक कारणांमुळे दीर्घकालीन तणाव निर्माण झाला आहे. भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अल्पसंख्याकांसाठी सौगात हे मोदी नावाची मोहीम सुरू केली. या योजनेचा सुमारे 32 लाख मुस्लिम बांधवांना फायदा झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुस्लिम बंधू आणि भगिनींना आवाहन केले की, मुस्लिम समुदायाच्या एका हातात कुराण आणि दुसऱ्या हातात लॅपटॉप असावा अशी माझी इच्छा आहे. तिहेरी तलाक हा इस्लाम मध्ये प्रचलित घटस्फोटाचा एक प्रकार आहे ज्यामध्ये मुस्लिम पुरुष तीन वेळा तलाक उच्चारून आपल्या पत्नीला कायदेशीर रित्या घटस्फोट देऊ शकतो.30 जुलै 2019 रोजी भारतीय संसदेने तिहेरी तलाकची प्रथा बेकायदेशीर आणि असंवैधानिक घोषित केली आणि 1 ऑगस्ट 2019 पासून ती दंडनीय कृती म्हणून घोषित केले. हिंदू आणि मुस्लिमांमधील ध्रुवीकरण कमी करण्यासाठी आणि मुस्लिमांची मते पक्षाकडे आकर्षित करण्यासाठी भाजप सरकारने हाती घेतलेल्या उपाययोजनांपैकी हा एक भाग आहे. भारत सरकारने धर्मनिरपेक्ष तत्व स्वीकारलेले आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे भारतीय संविधान हे जगात सर्वोच्च आहे. म्हणून भारतातील ध्रुवीकरण हे पूर्णपणे राजकीय आहे,सामाजिक नाही.
पाकिस्तान मध्ये सुन्नी विरुद्ध शिया असा तणाव आणि धार्मिक अतिरेकीपणा हे प्रमुख मुद्दे ध्रुवीकरणाकडे नेणारे आहेत. त्यामुळे पाकिस्तानात राजकीय अस्थिरता, भ्रष्टाचार, मंद आर्थिक वाढ ,कमकुवत प्रशासन आढळून येते.बांगलादेशमध्ये स्वातंत्र्यानंतर खूप राजकीय हिंसाचार आणि लष्करी राजवट होती.त्यामुळे आर्थिक असमानता या देशांमध्ये निर्माण झाली.राजकीय अस्थिरता, लोकशाही नियमांचे उल्लंघन, भ्रष्टाचार आणि मानवी हक्काच्या समस्या त्यामुळे निर्माण झाल्या.
राजकीय ध्रुवीकरणाला तोंड देण्यासाठी संवाद, संस्थात्मक सुधारणा, लोकशाही संस्था मजबूत करणे आणि प्रादेशिक सहकार्य यांचा समावेश असलेला बहुआयामी दृष्टिकोन आवश्यक आहे.

अल्पसंख्याकांच्या हक्कांचे रक्षण करणे, सामाजिक आणि आर्थिक असमानता दूर करणे,
शांतता, सुरक्षा आणि विकासाला चालना देण्यासाठी प्रादेशिक सहकार्य करणे आवश्यक आहे.यासाठी
खुला संवाद,
मजबूत लोकशाही व्यवस्था
सामाजिक आणि आर्थिक न्याय
आणि प्रादेशिक सहकार्य आवश्यक आहे.
सध्या, भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश या तिन्ही देशांच्या समस्या जवळजवळ सारख्याच आहेत, परंतु सामान्य किमान कार्यक्रमाप्रमाणेच, तिन्ही देशांनी या दीर्घकालीन समस्येवर योग्य तोडगा काढण्यासाठी आणि एकमेकांना मदत करण्यासाठी धोरण स्वीकारले पाहिजे.या वेळी या शोधनिबंधाच्या माध्यमातून जगातून आलेल्या सर्व प्रतिनिधींना प्रा.डॉ.सुनील नेवे यांनी आवाहन केले की,
चला जगासमोर एक नवीन आदर्श ठेवूया, जसे की एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ म्हणजे आपण एकमेकांना सहकार्य करूया आणि
विकासाचा न्याय्य मार्ग साध्य करूया आणि राष्ट्र, धर्म, पंथ, लिंग, भाषा, वंश या पलीकडे जाऊन वैश्विक मानवतेसाठी एकत्र काम करूया आणि जागतिक कल्याणाचे ध्येय साध्य करूया..प्रा.डॉ.
सुनील नेवे यांचे सेकंडरी एज्युकेशन सोसायटी भालोद चे अध्यक्ष श्री.चंद्रकांत जगन्नाथ चौधरी, चेअरमन श्री लीलाधर विश्वनाथ चौधरी,व्हाइस चेअरमन श्री.मोहन वासुदेव चौधरी, उपाध्यक्ष श्री अनिल सुधाकर चौधरी सचिव श्री नितीन वासुदेव चौधरी यांचेसह संस्थेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी व संचालक,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर कोल्हे, सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी वर्ग आणि विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्याकडून अभिनंदन करण्यात येत आहे.