भुसावळ (प्रतिनिधी ) – तरसोद येथील हर्षल प्रकाश बोरोले व गायत्री हर्षल बोरोले यांचं नातं एकेकाळी तुटलं होतं, पण आज ते पुन्हा नव्याने फुललं आहे. श्री. ज्ञानदेव आवसू ढाके (आसोदा) यांची कन्या गायत्री आणि हर्षल यांचा विवाह 6 फेब्रुवारी 2021 रोजी पार पडला होता. त्यांना दोन वर्षांची एक सुंदर कन्या कु. युवाश्री हर्षल बोरोले आहे.

मात्र एकमेकांमध्ये गैरसमज, सततचे वादविवाद आणि माहेरी वारंवार जाण्याच्या कारणावरून मतभेद वाढले. खूप समजावूनही अखेर 1 डिसेंबर 2024 रोजी भोरगाव लेवा पंचायत, भुसावळ शाखेत या दोघांचा अधिकृत घटस्फोट झाला.
मात्र, जशी वेळ गेली तसा राग कमी झाला, दोघांनाच्या मनात मुलीच्या भविष्याचा विचार आला, आणि दोघांनीही आपापल्या चुका ओळखल्या. आणि लक्षात आले, प्रेमाच्या या बंधनाला पूर्णतः तोडून टाकणं सहज नव्हतं. दोघेही भोरगाव लेवा पंचायत भुसावळ शाखेत आले. तेथे शाखा प्रमुख सुहास चौधरी यांच्याशी बोलले. सामुपदेशीका आरती चौधरी यांनी दोघांनाही भावी आयुष्यात कराव्या लागणाऱ्या तडजोडीची कल्पना दिली. अखेरीस कुटुंबनायक ललित पाटील, सुहास चौधरी, आरती चौधरी, शरद फेगडे, आर. जी. चौधरी, सुभाष भंगाळे, संजय पाटील, कावेरी चौधरी, या पंचाच्या साक्षीने साडीचोळीने ओटी भरून, अत्यंत प्रेमाने, चार समजूतीच्या गोष्टी सांगून पाठवणी करण्याचे ठरले.
त्या प्रमाणे 29 जून 2025 रोजी दोघांनी घटस्फोट रद्द केला आणि गायत्री पुन्हा नवऱ्याजवळ नांदायला गेली.
सध्या हर्षल हे नवजीवन सुपर शॉप, जळगाव येथे नोकरी करत असून, नव्या सुरुवातीसाठी दोघंही सकारात्मक आहेत. जुने वाद विसरून, आपल्या छोट्या कुटुंबासाठी त्यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे.
ही केवळ एक कौटुंबिक घटना नसून, नात्यांमधील समजूत, क्षमा, संवाद आणि प्रेम यांची जिवंत उदाहरण आहे. समाजाला सांगणारी ही एक प्रेरणादायी गोष्ट आहे की “प्रेमात माफी असते, आणि नात्यांना दुसरी संधी द्यावी लागते.” भोरगाव लेवा पंचायत भुसावळ शाखेच्या इतिहासात “घटस्फोट होऊन परत एकत्र आले” अशी केस प्रथमच नोंदवली गेली आहे.


