भुसावळात चार अनोळखी टवाळखोरांकडून युवकावर चाकू हल्ला –

भुसावळ (प्रतिनिधी ) – : शहरातील रेल्वे परिसरातील कावेरी कॉलनीत चार अनोळखी टवाळखोरांनी एका युवकावर चाकूने हल्ला करून खुनाचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवार, 7 मे) पहाटे 1.20 वाजता घडली. या प्रकरणी येथील शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

अभिषेक रमेशचंद्र रावत (21, रा. क्वार्टर नं. 350, कावेरी कॉलनी, आठ बंगला, भुसावळ) हा रेल्वेने बाहेरगावाहून येऊन घराकडे जात होता. अभिषेक रेल्वे युनियन ऑफिसजवळून आपल्या घराकडे पायी जात असताना, तु आमच्याकडे का पाहतो? या कारणावरून चार अनोळखी व्यक्तींनी त्याच्याशी वाद घालून चाकू व फाईटरने हल्ला केला तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करत त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. या संशयीतांपैकी एका व्यक्तीने काळा टी-शर्ट व लाल हाफ पँट परिधान केली होती. उर्वरित संशयीतांचे वय अंदाजे 25 ते 28 वर्षे असून, अंगकाठी सडपातळ आहे. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

तपास सहायक पोलीस निरीक्षक राहुल भंडारे करत आहेत. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे व पोलीस निरीक्षक उध्दव डमाळे यांनी भेट देऊन पाहणी केली. या घटनेनंतर शहरात पुन्हा एकदा गुन्हेगारांनी डोके वर काढल्याचे दिसून येत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी अशा घटनांत वाढ होत असून, पोलिसांनी यावर ठोस कारवाई करून या प्रकारांना आळा घालावा, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. घटनेतील संशयीत त्या परिसरातील सीसीटिव्ही कॅमेर्‍यामध्ये दिसत आहे. पोलिस त्या संशयीतांचा शोध घेत आहे.