ऐतिहासिक महापुरुषांचा प्रेरणादायी इतिहास शाहिरांमुळेच जिवंत ; नगरदेवळ्यात आमदार किशाेर पाटील यांचे गाैरवाेद‌्गार, राज्य शाहिरी प्रशिक्षण शिबिराचा समाराेप;

पाचाेरा : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र शासन मुंबईतर्फे नगरदेवळा येथे दहा दिवशीय राज्य शाहिरी प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. त्याचा समारोप गुरुवारी नगरदेवळा येथे संत सखाराम महाराज संस्थान सांस्कृतिक हॉल येथे पार पडला. ‘ऐतिहासिक महापुरुषांचा प्रेरणादायी इतिहास शाहिरांमुळेच जिवंत आहे. या कलेला प्राेत्साहन देण्यासाठी असे कार्यक्रम गावाेगावी झाले पाहिजे’ असे गाैरवाेद‌्गार पाचाेऱ्याचे आमदार किशाेर पाटील यांनी काढले.
पाचोरा तालुक्याचे तहसीलदार विजय बनसोडे, माजी जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब मनोहर पाटील,पोलिस निरीक्षक दळवी, शिवनारायण जाधव, अभिलाषा रोकडे, अविनाश कुडे, सागर पाटील, रवींद्र पाटील, शाहीर विनोद ढगे, शाहीर उत्तम गायकर शिबिर संचालक शाहीर शिवाजीराव पाटील इत्यादी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत घेतल्या जाणाऱ्या शाहिरी प्रशिक्षण शिबिराचा मुख्य उद्देश हाच आहे की भविष्यात ही कला संपवू नये म्हणून प्रत्येक जिल्ह्यात दरवर्षी सांस्कृतिक विभागामार्फत नवनवीन विद्यार्थ्यांना शाहिरीचे प्रशिक्षण देण्यासाठी अशा शिबिरांची आवश्यकता असते असे आमदार किशाेर पाटील म्हणाले. शिबिरात ४८ विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभागी झाल्या. त्यांना शाहिरी प्रशिक्षण शिबिराचे प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. बालकलावंतांनी दहा दिवसात घेतलेल्या प्रशिक्षणातून जे शिक्षण घेतले त्याचे सादरीकरण उपस्थित मान्यवरांच्या समोर अतिशय उत्साहात सादर केले.

अचूक नियाेजन मान्यवरांना भावले
राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, राज्याचे अप्पर सचिव तथा सांस्कृतिक विभागाचे सचिव विकास खारगे व सांस्कृतिक विभागाचे संचालक विभीषण चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर झाले, या कार्यक्रमात शाहीर विनोद ढगे यांनी देखील खानदेशातील शाहिरी परंपरा व महाराष्ट्रातील शाहीर परंपरेचा इतिहास मांडला. शिबिर संचालक शाहीर शिवाजीराव पाटील यांनी शाहिरी परंपरेच्या माध्यमातून बालकलावंतांना शिक्षण देणे का गरजेचे आहे आणि भविष्यात शाहीर घडवणे का गरजेचे आहे याचा ओघवत्या शैलीत मसूदा मांडला. बालकलावंतांचे पोवाडे आणि लोकगीते सादर करण्यात आली. राज्य गीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते शिवनारायण जाधव, प्रकाश जगताप, सौरभ तोष्णीवाल, शैलेंद्र बिरारी, अविनाश कुडे, सुरज राऊळ भूषण पवार, कुणाल राऊळ, भागवत महाजन, नामदेव सोनवणे, सिताराम महाजन, रामसिंग राजपूत, राजेंद्र जोशी, जितेंद्र भांडारकर, गोकुळ पाटील, भूषण पवार, वेदराज कपाटे, दिगंबर पाटील, अशोक पाटील व रसिक उपस्थित हाेते. सूत्रसंचालन शाहीर जितेंद्र भांडारकर यांनी केले. प्रास्ताविक शाहीर गोकुळ पाटील यांनी केले.