धक्कादायक.. तीर्थक्षेत्र आळंदीत १५ वर्षीय विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार ; दोघा महाराजांवर गुन्हा दाखल

आळंदी,

आळंदीमधून पुन्हा एकदा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तीर्थक्षेत्र आळंदी येथील नामांकित वारकरी संस्थेत एका पंधरा वर्षीय विद्यार्थ्याचा लैंगिक छळ झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी दोन महाराजांवर मंगळवारी रात्री उशिरा पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धार्मिक शिक्षण देणारा महाराज महेश पोपट नरोडे ( वय २७) आणि आणि गौरव दत्तात्रय माळी (वय २१) अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघा आरोपींची नावे आहेत. दरम्यान जानेवारी महिन्यापासून तिस-यांदा अशी घटना घडल्याने महाराजांच्या गैरकृत्याबाबत आळंदीत संताप व्यक्त केला जात आहे.

पिडित मुलगा विधीसंगर्षित बालक आहे. ही घटना जानेवारी महिन्यात घडली. पिडित मुलगा हा रात्री जेवण करून अन्य मुलांसोबत झोपला होता. यावेळी रात्री बारा ते एकच्या दरम्यान आरोपी गौरव माळी हा पिडित मुलाच्या जवळ येवून झोपला आणि अश्लिल चाळे करू लागला. तसेच शरिरसंबंधाची मागणी करू लागला.

सलग तीन दिवस असाच प्रकार आरोपी माळीने संबंधित विद्यार्थ्यासोबत केला. त्यानंतर या घटनेची माहिती पिडित मुलाने महेश नरोडे याला सांगितला. मात्र नरोडे याने कोणतीही कारवाई केली नाही. तसेच घरच्या लोकांना सांगू नको अशी धमकीही दिली. अखेर पिडित मुलाने दिघी पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली.

दरम्यान आळंदीत दोन महिन्यात तिस-यांदा अशी घटना घडल्याने आळंदीतील तरूणाईमधे संताप व्यक्त केला जात आहे. अशा घटना वारंवार होत असल्याने आळंदीतील सर्व वारकरी शिक्षण संस्था आता बंद करा. अशी मागणी पुन्हा जोर धऱू लागली आहे. यापूर्वीच आळंदीकरांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्याकडे आळंदीत विविध संस्थांमधून बालकांचे होणारे शारिरिक आणि आर्थिक शोषण बाबत तक्रार केली होती.

त्यानंतर चाकणकर यांनी आळंदी पोलिस ठाण्यात बैठक घेतली. आणि संस्थांची तपासणी करून ४८ तासात कारवाईचे आदेशही दिले होते. त्यानंतर विविध सरकारी यंत्रणांनी एकत्र येत १६५ संस्थांची तपासणी करून जिल्हाधिकारी पुणे यांचेकडे अहवाल दिला. त्यानंतर मात्र कारवाई ठप्प झाली. यामुळे अद्यापही मुलांच्या लैंगिक घटना हळूहळू उघड होत आहे. आत सरकारकडून याबाबत दखल घेणे आवश्यक असल्याचे आळंदीकरांचे म्हणणे आहे.