चोपडा,

मध्यप्रदेशच्या सीमेवर असलेल्या एका कुख्यात कट्टा विक्री करणाऱ्या आरोपीस अटक करण्यासाठी गेलेल्या ग्रामीण पोलीस ठाण्यातील ए. पी. आय. शेषराव नितनवरे, पोलीस नाईक शशिकांत पारधी, दीपक शिंदे, किरण पारधी, चेतन महाजन, विशाल पाटील व होमगार्ड रोशन बाविस्कर, विश्वास भिल यांच्या 3 तुकड्या वेगवेगळ्या करून गेलेल्या पोलीस अधिकाऱ्यासह 6 पोलीस कर्मचाऱ्यावर उमर्टी येथील अवैध शस्त्र गावठी कट्टा विकणाऱ्या सुमारे 40 ते 50 लोकांच्या जमावाने हल्ला चढवून डोक्याला गावठी कट्टा लावून अपहरण केल्याने एकच खळबळ उडाली होती.
चोपडा तालुक्यातील महाराष्ट्र व मध्यप्रदेश सीमेवर अवैध गावठी कट्टे बनविणारे शिकलकर समाजाची वस्ती असून बऱ्याच वर्षापासून अवैध कट्टे विक्रीचे केंद्र बनले आहे. अधूनमधून कारवाई ही होते. पण बऱ्याच वर्षापासून यांचा मुखीया म्हणून पप्पीसिंग बर्णाला हा पोलीसांच्या रडावर होता. दिनांक रोजी तो आल्याची गुप्त बातमी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्याना कळली त्यानुसार सापळा रचून हे अधिकारी तेथे गेले असता यांनी तीन तुकड्या तयार करून उमर्टी रस्त्यावर उभा असलेला पप्पीसिंग व त्याचा साथीदार याला पकडले. त्यावेळी पोलीस व त्यांच्यात बराच वेळ झटापटी झाली त्यावेळी अचानक पोलीस उपनिरीक्षक शेषराव नितनवरे व शशी पारधी यांच्यावर जमावाने हल्ला करत त्यांच्या डोक्याला बंदूक लावून मारहाण करत अपहरण करण्यात आले.
त्यावेळेस शेषराव नितनवरे यांनी स्वतःचा व कर्मचाऱ्यांचा जीव वाचविण्यासाठी हवेत गोळीबार केला त्याचे प्रतिउत्तर समोरच्या आरोपींनी ही गावठी कट्ट्यातुन गोळीबार करून दिले. त्यावेळी नितनवरे यांच्यावर अचानक काही लोकांनी हल्ला करत त्यांना जमिनीवर खाली पाडले व पायावर मारहाण करून गंभीर इजा केली. आणि शशिकांत पारधी यांचे अपहरण करून डोक्याला बंदूक लावून तिथून घेऊन गेले. त्यांना ही एका बंद घरात नेऊन अमानुषपणे मारहाण करून जखमी केले.
काही वेळाने पोलीस अधीक्षक यांना घटनेची माहीती मिळताच त्यांनी मध्यप्रदेशच्या पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांच्यामार्फत गावातील सरपंच व पोलीस कर्मचारी यांच्या माध्यमातून शशिकांत पारधी यांची सुटका करण्यात आली. पण तेवढ्या वेळेत बंदिस्त असलेल्या पारधी यांच्यावर काय प्रसंग घडला तो सांगणे कठीणच. गावातील वीजपुरवठा ही तेथील आरोपींनी बंद केला. पोलीस कर्मचाऱ्यांना तेथे जाण्यासाठी मार्ग सापडत नव्हता. त्यावेळी अंधारात मार्ग काढत व दरी खोऱ्यातुन कसेतरी पोलीस मार्ग काढून तेथे पोहोचले व कर्मचाऱ्याची सुखरूप सुटका करून चोपडा येथे आणले.
अर्ध्या तासाच्या झटापटीतही मुख्य आरोपी पप्पीसिंग याला पोलीस कर्मचारी शशिकांत पारधी व पोलीस उपनिरीक्षक शेषराव नितनवरे यांनी सोडले नाही. सोबत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या स्वाधीन मुख्य आरोपीला सुपुर्द केले. ही पोलीस कर्मचारी व अधिकारी यांची जमेची व अभिमानाची बाब म्हणून कौतुकास्पद आहे. महाराष्ट्रात अशा प्रकारची घटना ही पहिल्यांदाच घडलेली असून आपण एखाद्या सिनेमात बघतो किंवा यूपी किंवा बिहार मध्ये ज्या घटना घडतात आपण ऐकतो वाचतो त्याहूनही भयंकर घटना आताच्या आधुनिक युगात अशी घटना महाराष्ट्र पोलीसांच्या बद्दल घडली हे बघून सर्वत्र खळबळ उडाली आहे.
या घटनेची गंभीरपणे दखल घेऊन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, उपअधीक्षक कविता नेरकर, उपअधीक्षक घोलप, पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर, यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष व झेडपी सदस्य सुनील पाटील वाळकीकर सामाजिक न्याय विभागाचे शहर अध्यक्ष मिलिंद सोनवणे यांनी भेट घेऊन विचारपूस केली. जखमीं असलेल्या पोलीस उपनिरीक्षक शेषराव नितनवरे यांना व शशिकांत पारधी व सोबतचे कर्मचारी यांना चोपडा येथील मोरेश्वर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असून उपनिरीक्षक नितनवरे यांच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत असून हाड मोडले आहे. त्यांच्यावर डॉ. सागर पाटील उपचार करीत आहेत.


