महाकुंभातील चेंगराचेंगरीनंतर सर्व व्हीआयपी पास रद्द : न्यायालयीन चौकशी होणार –

प्रयागराज – महाकुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीत तब्बल 30 भाविकांचा मृत्यू झला तर 60 हून अधिक भाविक बुधवारी जखमी झाले होते. याप्रकरणाची आता न्यायालयीन चौकशी होणार असून योगी सरकारने आताप सर्व व्हीआयपी पास रद्द केले आहेत.

योगींची घोषणा : न्यायालयीन चौकशी
मृतांमध्ये कर्नाटकमधील बेळगावचे चार, आसाम व गुजरातमधील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 25 लाख रुपयांची भरपाई जाहीर करण्यात आली आहे. या दुर्घटनेनंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी न्यायालयीन आयोगाला चौकशीचे आदेश दिले आहेत.

पोलिस चौकशी देखील सुरू करण्यात आली आहे. तसेच, दुर्घटनेनंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तातडीने पावले उचलली आहेत. महाकुंभमेळा परिसरात वाहनांच्या ये-जा करण्यावर बंदी घालण्याचे आणि सर्व व्हीआयपी पास रद्द करण्याचे निर्देश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत.

4 फेब्रुवारीपर्यंत भाविकांना संगमावर पायी जाण्याची परवानगी असणार आहे. प्रयागराज शहरात चारचाकी वाहनांच्या प्रवेशावरही बंदी घालण्यात आली आहे. शहरात फक्त दुचाकी, रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाला प्रवेश दिला जाईल. तसेच, महाकुंभमेळा परिसर वाहनमुक्त क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे.

मौनी अमावस्येच्या दुर्घटनेतून धडा घेत सरकारने आता ठोस पावले उचलली आहेत आणि महाकुंभमेळा परिसरातील व्यवस्थेत बदल केले आहेत. सरकारने महाकुंभमेळा परिसरातील रस्ते वन-वे केले आहेत. आता स्नान केल्यानंतर भाविकांना दुसर्‍या मार्गाने परत पाठवले जाईल. याशिवाय, प्रयागराजला येणार्‍या 8 प्रमुख सीमा बंद करण्यात आल्या आहेत, ज्यामुळे गर्दी नियंत्रणात येण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे.