जळगाव (प्रतिनिधी) : डोक्यावर शेतीसाठी घेतलेले कर्ज, उधार-उसनवारी तसेच शेतमालाला भाव मिळत नाही यामुळे नैराश्यात गेलेल्या शेतकऱ्याने प्रजासत्ताक दिनालाच रविवारी राहत्या घरी विषारी औषध पिऊन आ,आपत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दि. २८ जानेवारी रोजी पहाटे १ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी यावल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरु होते.

हिरालाल पंढरीनाथ सोनवणे (वय ३७, रा. पिळोदा ता. यावल) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. तो पिळोदा येथे आई, भाऊ, पत्नी, २ मुले यांच्यासह राहत होता. शेतीकाम करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. (केसीएन) दरम्यान, शेतीसाठी त्यांनी कर्ज घेतले होते. तसेच गावात उसनवारी झाल्यामुळे हिरालाल यांच्यामागे तगादा सुरु झाला होता. तर दुसरीकडे, शेतमालाला भाव मिळत नसल्याने हिरालाल हे तणावात होते, अशी माहिती नातेवाईकांनी दिली. त्यामुळे त्यांनी प्रजासत्ताक दिनी रविवारी दि. २६ जानेवारी रोजी संध्याकाळी ५ वाजता कीटकनाशक पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
कुटुंबियांना लक्षात येताच त्यांनी हिरालाल यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे उपचारासाठी केले. तेथे अतिदक्षता विभागात उपचार सुरु असताना मंगळवारी पहाटे १ वाजेच्या सुमारास हिरालाल सोनवणे यांची प्राणज्योत मालविली. यानंतर कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. दरम्यान, घटनेप्रकरणी यावल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरु होते.


