बोदवड महाविद्यालयात अग्निवीर, सैन्यदल व पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण अभियान उत्साहात संपन्न :


बोदवड (प्रतिनिधी) – येथील बोदवड एज्युकेशन सोसायटीचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे दिनांक 13 जानेवारी 2025 ते 18 जानेवारी 2025 या कालावधीत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, विद्यार्थी विकास विभाग, जळगाव आणि बोदवड एज्युकेशन सोसायटीचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, युवती सभा आणि विद्यार्थी विकास कक्ष, बोदवड यांच्या संयुक्त विद्यमाने सदर अभियान महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक अरविंद चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडले. या अभियानासाठी साधन व्यक्ती म्हणून माजी एनसीसी ऑफिसर डॉ. मनोज निकाळजे, माजी सैनिक (बीएसएफ) युवराज गाढे, लेफ्टनंट प्रा. दीपक पाटील पी. ओ. नहाटा महाविद्यालय भुसावळ, कॅप्टन डॉ. राजेंद्र राजपूत धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर लाभले होते.
अभियानाच्या पहिल्या दिवशी बोदवड महाविद्यालयातील माजी एनसीसी ऑफिसर डॉ. मनोज निकाळजे यांनी अभियानाची प्राथमिक माहिती, सशस्त्र सेना माहिती आणि प्रशिक्षणाचा परिणाम या विषयावर अभियानात सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सोबतच अभियानाची ध्येय आणि उद्दिष्ट देखील आपल्या प्रभावी भाषणातून व्यक्त केले.
तसेच धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर येथून एनसीसी कॅडेट अजय चौधरी आणि निलेश पाटील यांनी अग्निवीर भरती आणि सैन्यदल भरती प्रक्रिया तसेच परीक्षा पद्धत, ग्राउंड कसे घेतले जाते हे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले तदनंतर विद्यार्थिनींची कवायत घेतली.

अभियानाच्या दुसऱ्या दिवशी माजी सैनिक (बीएसएफ) युवराज गाढे, विवरा ता. रावेर यांनी कवायती सावधान, विश्राम आणि तेज चल याबद्दल प्रशिक्षण दिले सोबतच सैन्य दलातील एकंदरीतच अनुभव विद्यार्थ्यांसोबत मांडला. धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर येथील एनसीसी कॅडेट नकुल सपकाळे यांनी देखील विद्यार्थ्यांची कवायत करून घेण्यास मदत केली.

अभियानाच्या तिसऱ्या दिवशी पी . ओ. नहाटा महाविद्यालय भुसावळ येथील लेफ्टनंट प्रा. दीपक पाटील यांनी युद्धनीती, बॅटल क्राफ्ट आणि वेपन ट्रेनिंग या विषयावर विस्तृत मार्गदर्शन केले एवढेच नव्हे तर रायफल धरणे, चालवणे त्या संदर्भातील माहिती देखील प्रात्यक्षिक सादर करून दिली. त्यांच्यासोबत असलेले एनसीसी कॅडेट रोहन जोहरे आणि गणेश अहिर यांनी मदत केली.

अभियानाच्या चौथ्या दिवशी धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर येथील कॅप्टन डॉ. राजेंद्र राजपूत यांनी व्यक्तिमत्व विकास आणि नेतृत्व गुण विकास या विषयावर पावर पॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्कृष्ट शैलित मार्गदर्शन करून प्रभावित केले. एनसीसी कॅडेट ऋषिकेश पाटील आणि निलेश पाटील यांनी देखील विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला. तदनंतर, सैन्यदल भरती कार्यालय, संभाजीनगर येथील संचालक, कर्नल अनुज सिंघल यांनी सैन्यदल भरतीची संपूर्ण प्रक्रिया, पात्रता वगैरे विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने विशद केले.

अभियानाच्या पाचव्या दिवशी माजी सैनिक युवराज गाढे यांनी धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर येथील एनसीसी कॅडेट दीपक मिलिंद कोल्हे यांच्या मदतीने शारीरिक कवायती, जजिंग डिस्टन्स आणि बॅटल फिल्ड या विषयावर मार्गदर्शन करत गोळा फेक आणि थाळी फेक अशा प्रकारचे मैदानी खेळ सुद्धा प्रस्तुत केला.

अभियानाच्या सहाव्या दिवशी आणि समारोप समारंभ प्रसंगी नियोजित अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक अरविंद चौधरी आणि प्रमुख अतिथी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य मा. नितीनजी झाल्टे काही अपरिहार्य कारणास्तव उपस्थित राहू शकले नाहीत म्हणून ऐनवेळी विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. अजय पाटील यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष तर सहाय्यक विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. मनोज निकाळजे यांनी प्रमुख अतिथी यांची भूमिका पार पाडत समारोप समारंभ पार पाडला. डॉ. मनोज निकाळजे यांनी अग्निवीर भरती पूर्व प्रशिक्षण अभियान मध्ये सहभागी असलेल्या सर्व विद्यार्थिनी ह्या महाविद्यालयाच्या रणरागिणी आहेत असे संबोधून विद्यार्थिनींचा उत्साह वाढवला. विद्यार्थिनींनी रोज पहाटे चार ते पाच किलोमीटर धावणे, व्यायाम व प्राणायाम करणे, स्वतःला तंदुरुस्त ठेवणे आवश्यक आहे तरच आपण अग्निवीर किंवा सैन्यदल भरती मध्ये सहभागी होऊ शकतो हेही सांगितले. डॉ. अजय पाटील यांनी अध्यक्षीय भाषणात अग्निवीर भरतीपूर्व प्रशिक्षण आणि सैन्यदल व पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण अभियान राबवून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभावना, राष्ट्रभिमान आणि राष्ट्रभक्ती उत्पन्न होते सोबतच नवचैतन्य निर्माण होते, सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण होते असे सांगितले. सहभागी विद्यार्थ्यांना जे काही प्रशिक्षण या सहादिवशीय अभियानातून प्राप्त झाले ते नियमितपणे तेवत ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. अग्निवीर, सैन्यदल भरती आणि पोलीस भरती मध्ये विद्यार्थिनींना मोठ्या प्रमाणात नोकरीची संधी येत्या काळामध्ये असणार आहे असे सांगितले.
या अभियानामध्ये एकूण 50 मुली सहभागी झाल्या. या सहा दिवसीय अभियानामध्ये आलेले विविध अनुभव आणि प्रशिक्षण संदर्भातील मनोगते उत्तरा चंद्रकांत जोशी, रोहिणी धनगर, पायल राजपूत, वैष्णवी घुले, पूजा बोदडे आणि दीप्ती किनगे यांनी व्यक्त केले. सहभागी विद्यार्थिनींनी महाविद्यालयाच्या संपूर्ण शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासमोर कवायतीचे सादरीकरण केले.
समारोप समारंभ प्रसंगी अहवाल वाचन, सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन युवती सभा प्रमुख डॉ. डॉक्टर रूपाली तायडे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.