जळगाव – जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढल्याने, सन २०२४ मध्ये ५६१ अपघातांत ४४१ जणांचा मृत्यु झाल्याचे समोर आले आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी, सर्व दुचाकी वाहन चालकांना हेल्मेट परिधान करणे अनिवार्य करण्यात आले आहे.

मोटार वाहन कायदा, १९८८ च्या कलम १२९ नुसार आणि सर्वोच्च न्यायालयाच्या वेळोवेळी दिलेल्या आदेशानुसार भारतात कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी दुचाकी वाहन चालविणाऱ्या तसेच पाठीमागे बसणाऱ्या व्यक्तीला हेल्मेट परिधान करणे बंधनकारक आहे. हे नियम १ जानेवारी २०२५ पासून कठोरपणे लागू होणार आहेत.
हेल्मेट परिधान केल्यास अपघाताच्या वेळी जीव वाचण्याची शक्यता ८० टक्क्यांनी वाढते, असे विश्लेषण समोर आले आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी मोटार वाहन चालवितांना नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी आदेश दिले असून, हेल्मेट न वापरणाऱ्या नागरिकांना मोटार वाहन कायदा १९८८ च्या तरतुदींनुसार दंड ठोठावला जाईल. “फक्त राष्ट्रीय महामार्गांवरती हेल्मेट सक्ती करण्यात येत आहे.” यामुळे सर्व नागरिकांनी याबाबत गांभीर्याने विचार करून हेल्मेट वापरणे आवश्यक आहे.


