भुसावळातील डॉक्टरांना 20 हजाराचा गंडा :दोघां भामट्याविरोधात गुन्हा –

भुसावळ – शहरातील जामनेर रोडवरील आनंद नगर जवळील स्टेट बॅकेच्या एटीएममधून 63 वर्षीय डॉक्टर पैसे काढत असतांना भामट्यांनी पीन क्रमांक पाहत व एटीएमची अदलाबदल करीत मुक्ताईनगरातील एटीएममधून 20 हजार रुपये काढले. ही घटना 19 सप्टेंबरला संध्याकाळी सहा वाजता घडली.
जामनेर रोडवरील आनंद नगरातील भारतीय स्टेट बँकेच्या एटीएममध्ये गुरुवार, 19 रोजी संध्याकाळी सहा वाजता डॉ.गौतम नामदेर खरे हे पैसे काढत असतांना तेथे दोन अनोळखी उभे होते. त्यांनी हातचलाखी करीत डॉ.खरे यांचे एटीएम कार्ड बदल केले. बदल केलेल्या एटीएम कार्डचा वापर भामट्यांनी मुक्ताईनगरातील एटीएममधून तब्बल 20 हजार रूपये काढून घेतले. डॉ. खरे यांना मेसेज आल्यावर त्यांना आपल्या खात्यातून पैसे काढले गेल्याचे लक्षात आले. त्यांनी याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा अनोळखी व्यक्तीविरूध्द दाखल केला. तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार प्रशांत देशमुख करीत आहे.