भुसावळ – मानवी जीवनाला संजीवनी मंत्र देणारी श्रीमद्भगवतगीता आहे. याच गीतेवर श्रीसंत ज्ञानेश्वर महाराजांनी टीका करून ज्ञानेश्वरी लिहिली. ज्ञानेश्वरीच्या अंतिम असलेले पसायदान म्हणजे एक मोठा मानवी विचार आहे. हे पसायदान म्हणजे वेदमंत्राप्रमाणे असून संत ज्ञानेश्वरांची भावना वेदप्रणित आहे. त्यामुळे वेदांमधूनच वैश्विक विचाराच्या पसायदानाची संकल्पना आली असल्याचे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक हभप डॉ. तुळशीराम महाराज गुट्टे यांनी येथे केले.

भुसावळ येथील श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित अहिल्यादेवी कन्या विद्यालयात आयोजित वाचन संस्कार व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प गुंफताना ते बोलत होते. सार्वजनिक वाचनालयाच्या 154 व्या वर्धापन दिनानिमित्त तीनदिवसीय व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. प्रारंभी सार्वजनिक वाचनालयात दीपप्रज्वलन व पूजन करून सरस्वती मातेच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर अहिल्यादेवी कन्या विद्यालयात हभप डॉ. तुळशीराम महाराज गुट्टे यांचे व्याख्यान पसायदानातील वैश्विक विचार या विषयावर झाले. प्रारंभी प्रास्ताविकातून ग्रंथपाल नितीन तोडकर यांनी वाचनालयाचा इतिहास सांगून व्याख्यानमालयाच्या आयोजनाचा हेतू कथन केला. त्यानंतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. महाराष्ट्र शासनाचा राज्य शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ. जगदीश पाटील यांचा वाचनालयातर्फे हभप डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी महेंद्र मांडे तर प्रमुख पाहुणे म्हणून हभप श्यामचैतन्यजी महाराज, धर्मस्वरूप शास्त्रीजी महाराज, योगेंद्रशास्त्रीजी महाराज, लक्ष्मण महाराज, वाचनालयाचे अध्यक्ष हिम्मत उर्फ मुन्ना ठाकूर, अॅड. योगेश बाविस्कर, संजयसिंग चव्हाण उपस्थित होते. व्याख्याते हभप डॉ. तुळशीराम महाराज गुट्टे यांचा परिचय डॉ. जगदीश पाटील यांनी करून दिला. श्यामचैतन्यजी महाराज यांनी विद्यार्थ्यांना वाचन संस्कृतीचे महत्त्व सांगून वाचाल तर टिकाल असे सांगितले. धर्मस्वरूपदासजी यांनी वाचन संस्कृती वाढवण्यासाठी उपक्रम आवश्यक असल्याचे सांगितले. अध्यक्षीय मनोगतात महेंद्र मांडे यांनी वाचनालयाच्या उपक्रमाचे कौतुक करून विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कार रूजावे व अध्यात्माची पेरणी व्हावी यादृष्टिकोनातून अशा कार्यक्रमाची गरज असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन शिशीर जावळे यांनी केले. पसायदानातील वैश्विक विचार या विषयावर श्रोत्यांशी संवाद साधताना हभप डॉ. तुळशीराम महाराज गुट्टे म्हणाले की, संत मुक्ताईंमुळे ज्ञानेश्वरीची निर्मिती झाली. त्यांनी ताटीच्या अभंगातून आपल्या ज्ञानदादांना प्रेमाचे आवाहन केले. त्यानंतर ताटी उघडून बाहेर आल्यानंतर ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली व सच्चिदानंद बाबा यांनी ती लिहून घेतली. ज्ञानेश्वरीच्या 9033 असून शेवटच्या नऊ ओव्या पसायदानाच्या आहेत. पसायदानातून ज्ञानेश्वरांनी चैतन्यशक्तीकडे व्यापक मागणी केली आहे. संपूर्ण जगामध्ये शांती नांदावी आणि प्रत्येक व्यक्ती सुखी व्हावा असे मागणे पसायदानातून करण्यात आले आहे. संत साहित्य म्हणजे चालतेबोलते दीपस्तंभ आहेत. आधी आत्मस्वरूपाला ओळखायला हवे. यालाच अध्यात्म म्हणतात. ओम हे एकाक्षर ब्रह्म असून याच अक्षराने ज्ञानेश्वरीची सुरूवात झाली आहे. त्यामुळे अध्यात्माची पुस्तके वाचण्यावर आपण भर द्यायला हवा, असे आवाहन देखील हभप डॉ. तुळशीराम महाराज गुट्टे यांनी आपल्या व्याख्यानातून केले.
चौकट –
प्रत्येक शाळेत पसायदान सक्तीचे व्हावे
संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या अंतिम ओव्यांमधून पसायदानाची मागणी केली आहे. पसायदान हे सर्वांसाठी असून यात विश्वात्मक देवाचा विषय आला आहे. त्यामुळे शालेय शिक्षण घेत असताना प्रत्येक विद्यार्थ्यांवर अध्यात्मवादी संस्कार होण्यासाठी प्रत्येक शाळेत पसायदान सक्तीचे व्हावे, यासाठी मुख्यमंत्र्यांकडे अधिकृत निवेदनाद्वारे मागणी करणार असल्याचेही संत साहित्याचे अभ्यासक हभप डॉ. तुळशीराम महाराज गुट्टे यांनी सांगितले.


