नाशिक : नाशिकसह नागपूर, जळगावच्या आयकर विभागाने नाशिकमध्ये मोठी कारवाई केली असून या कारवाईची सध्या राज्यात चर्चा आहे. आयकर विभागाने नाशिकच्या कॅनडा कॉर्नर येथे असलेल्या सुराणा ज्वेलर्सवर मालकाने केलेल्या कथित अज्ञात व्यवहाराच्या तपासासाठी गुरुवारी मोठा छापा टाकला व सलग 30 तास झाडाझडती घेतली. सुमारे 26 कोटी रुपयांची रोकड तसेच 90 कोटींच्या बेहिशेबी मालमत्तेचे दस्तवेज जप्त करण्यात आल्यानंतर नाशिकमधील सराफा बांधवांचे धाबे दणाणले आहे. आता कारवाईचा फास कुणावर? अशी चर्चा रंगली आहे.
नाशिकमधील सुराणा ज्वेलर्स यांची पेढी तसेच त्यांच्या रिअल इस्टेट व्यवसायाच्या कार्यालयात छापा टाकण्यात आला. 55 अधिकार्यांच्या पथकाने एकाचवेळी कारवाई सुरू केली. राका कॉलनीतील आलिशान बंगल्यातदेखील स्वतंत्र पथकाने तपासणी सुरू केली. शहरात वेगवेगळ्या ठिकाणी असलेले त्यांचे कार्यालय, खासगी लॉकर्स व बँकांमधील लॉकर्सही तपासण्यात आले. मनमाड व नांदगावमधील त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या घरीही तपासणी केली.
कापडी पिशव्या, ट्रॅव्हलर्स बॅग, ट्रॉली बॅग्जमध्ये भरलेली रोकड सात कारमधून मोजणीसाठी सीबीएसजवळील स्टेट बँकेच्या कार्यालयात आणण्यात आली. शनिवारी रात्री 11.30 वाजता नोटांची मोजणी पूर्ण झाल्यानंतर अन्वेषणच्या वरिष्ठ अधिकार्यांनी रोकड ताब्यात घेतली. ज्या ठिकाणी छापेमारी सुरू होती, त्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता.
छाप्यात सुरूवातीला कार्यालयांमध्ये तसेच खासगी वॉॅल्टच्या लॉकर्समध्ये रोकड हाती लागली. मात्र, आणखी रकमेचा शोध सुरू होता. याचवेळी संबंधिताच्या अलिशान बंगल्यात पथकाने तपासणी केली. विविध खोल्यांच्या आतील लॉकर्समध्येही काही आढळून आले नाही. मात्र, अधिकार्यांना संशय आल्यावर त्यांनी फर्निचर ठोकून बघितले. फर्निचरचे प्लायवूड काढल्यावर आतील कप्यात नोटांच्या थप्प्या भिंतीप्रमाणे रचलेल्या दिसून आल्या. नोटांचा इतका मोठा ढीग लागला की, पैसे मोजण्यासाठी मशीन मागवण्यात आले. ही रोकड मोजण्यासाठी अधिकार्यांना तब्बल 14 तासांचा कालावधी लागला तसेच रोकड नेण्यासाठी सात कार मागवण्यात आल्या होत्या.
काही महिन्यांपूर्वी कस्टमने विमानतळावरून सोने तस्करी करणार्या व्यक्तींना अटक केली. आरोपींनी जप्त करण्यात आलेले सोने नाशिकमधील व्यापार्यांना विकल्याची कबूली दिली व पाच सराफा व्यावसायिकांची नावे समोर आली. आयकर विभागाने त्यांचा आयटी रिटर्नचा तपशील तपासला असता उत्पन्नापेक्षा मिळकत अधिक असल्याचे दिसून येताच छापेमारी झाली.



