रक्षा खडसे बहुमताने निवडून येतील फडणवीस यांचा भुसावळच्या सभेत विश्वास : :

भुसावळ – आता फैसला करण्याची वेळ आली आहे. तुम्ही हा निर्णय करायचा आहे. अजमल कसाबची सोबत करणाऱ्यांची सोबत करायची आहे, की ज्यांना फासावर चढवतात त्या उज्वल निकम साहेबांची सोबत करायची आहे. ही दिल्लीची निवडणूक आहे. रक्षाताईंनी गेल्या दहा वर्षात या ठिकाणी सातत्याने गावोगावी संपर्क ठेवला देशाच्या राज्याच्या माध्यमातून अनेक कामे या ठिकाणी केली. मोदीजींचा विकास या जिल्ह्यापर्यंत आणण्यात रक्षा खडसे यांचा वाटा आहे. त्यामुळे रक्षाताई पुन्हा तुमच्यापुढे मत मागण्यासाठी आल्या आहेत. त्यामुळे १३ मे रोजी रक्षाताईंना मतदान करून त्यांना भेट द्या. कारण १३ मे रोजी रक्षाताईंचा वाढदिवस आहे. त्यांना एक लाखाची लीड हे वाढदिवसाचे गिफ्ट देऊन त्यांना भरघोस मतांनी विजयी करा. जिल्ह्यातील दोन्ही जागा या प्रचंड बहुमताने निवडून येतील हा माझा विश्वास आहे, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला . रावेर मतदार संघाच्या उमेदवार खासदार रक्षा खडसे यांच्या प्रचारार्थ मातृभूमी चौकात जाहीर सभा मंगळवारी रात्री नऊ वाजता झाली. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला.
फडणवीस पुढे म्हणाले, ही निवडणूक काही छोटी मोठी निवडणूक नसून ही देशाच्या लोकसभेची निवडणूक आहे. देशाचा नेता निवडण्याची ही निवडणूक आहे. कोणाच्या हातात हा देश सुरक्षित असेल ही ठरवण्याची ही निवडणूक आहे. कोण देशाला विकासाकडे नेऊ शकतो हे समजण्याची निवडणूक आहे. सामान्य माणसाच्या आशा आकांक्षा अपेक्षा कोण पूर्ण करू शकतो याचा फैसला करण्याची ही निवडणूक आहे. आज देशांमध्ये या निवडणुकीमध्ये दोन भाग झाले आहेत. दोन ध्रुव तयार झाले आहेत. एकीकडे विश्व गौरव असलेले विकास पुरुष माननीय नरेंद्र मोदीजी आहेत. आणि मोदीजींच्या नेतृत्वात आपली महायुती आहे. या महायुतीमध्ये शिवसेना आहे. राष्ट्रवादी आहे. रिपाई रासपा मनसे आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या आमच्या संघटना आहेत. एक मजबूत महायुती मोदीजींच्या नेतृत्वात तयार केली आहे. तर दुसरीकडे कोण आहेत. राहुल गांधी आहेत. आणि त्यांच्या नेतृत्वात 24 पक्षांची खिचडी आहे, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भुसावळ येथील प्रचार सभेत लगावला.यावेळी बोलतांना ते म्हणले, भाजपा किंवा महायुतीने कुठल्याही चुकीच्या गोष्टी आम्ही करणार नाही. रोहित पवारांना जे अश्रू अनावर झाले त्याबाबत मी काय बोलायचं जनताच बोलते आहे.. भावनिक वातावरण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्याबाबत जनताच निर्णय घेईल. बारामतीत सगळ्यांनी शांतता राखावी आणि इमोशनल अत्याचार करु नये असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.
मी व गिरीशभाऊ महाजन हे बेरर चेक असून आमदार संजय सावकारे यांनी सांगितलेली सर्व कामे आपण मार्गी लावणार असल्याची ग्वाही फडणवीस यांनी दिली. भुसावळातील अमृत योजनेसह एसआरपीएफ प्रशिक्षण केंद्र, बस पोर्ट, एमआयडीसी, भुयारी गटारी या विषयांना आगामी अधिवेशनात निधी देवून सर्व प्रश्न सोडवणार असल्याचे फडणवीस यांनी सांगून आमदार संजय सावकारे यांच्या कार्याचे कौतुक केले.
यावेळी व्यासपीठावर मंत्री गिरीश महाजन, खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, आमदार चंद्रकांत पाटील, माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, माजी आमदार चैनसुख संचेती, भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, शिवसेना जिल्हाध्यक्ष समाधान महाजन , रिपाइं उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रमेश मकासरे, रिपाइं जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी, माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, माजी सभापती राजेंद्र चौधरी, उद्योजक मनोज बियाणी, रजनी सावकारे, डॉ.केतकी पाटील, राजेंद्र फडके, रंजना महाजन, जयप्रकाश बाविस्कर, मोहन फालक, नंदू महाजन आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
आपल्या आक्रमक शैलीत फडणवीस म्हणाले की, विरोधी पक्षांकडे २४ पक्षांची खिचडी आहे मात्र नेतृत्व नाही व केवळ त्यांच्याकडे इंजिनच आहे मात्र डबेच नाही देशात मजबूत महायुती असून कणखर हातात देशाचे नेतृत्व आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचा दहा वर्षात चौफेर विकास केला असून त्यांच्या कार्याने अर्थशास्त्री देखील चकीत झाले आहेत. १० वर्षात ५० कोटी लोकांना गॅस देण्यात आला. ५५ कोटी लोकांना शौचालय, ६० कोटी लोकांना शुद्ध पाणी, ६२ कोटी युवकांना १० लाखांचे मुद्रा लोण कुठल्याही गॅरंटीविना देण्यात आले असून आता त्याची मर्यादा २० लाख रुपये करण्यात येईल, असे फडणवीस म्हणाले. देशातील ८० लाख बचत गटांना आठ लाख कोटी दिल्याने तीन लाख महिला आता लखपती दीदी झाल्या असून आगामी काळात आणखी सात लाख दीदी लखपती होतील, असे ते म्हणाले. २०२६ मध्ये ३३ टक्के महिला आमदार व खासदार होतील, असेही यावेळी फडणवीस म्हणाले.
आमदार संजय सावकारे यांनी आपल्या भाषणात भुसावळातील अनेक विषय प्रलंबित असल्याचे सांगितल्यानंतर फडणवीस यांनी मी व गिरीशभाऊ बेरर चेक असल्याचे सांगून आगामी अधिवेशनात सर्व विषय मार्गी लावण्याची ग्वाही देत भुसावळचे आमदार संजय सावकारे यांच्या कार्याचे कौतूक केले. भुसावळातील बस पोर्ट, एसआरपीएफ प्रशिक्षण केंद्र, अमृत योजना व भूमिगत गटारीसाठी निधीची तरतूद करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
तसेच फडणवीस यावेळी म्हणाले की, काँग्रेस काळात पीएम लाचार होता मात्र मोदीजींच्या हातात नेतृत्व आल्यानंतर देश स्वाभिमानी झाला आहे. देशातच आता संरक्षण उत्पादने बनू लागली असून ती एक्सपोर्ट होवू लागली आहे. पाकिस्तानात घुसून सर्जिकल स्ट्राईक करणारा आपला कणखर पंतप्रधान आहे त्यामुळे पाकिस्तानही आता मोदीजींची भीती वाटू लागली आहे. 2019 नंतर एकही बॉम्बस्फोट झाला नसल्याचे सांगून त्यांनी काँग्रेस काळात घडलेल्या बॉम्बस्फोटांचा पाढा वाचला. यावेळचे मतदान केवळ रक्षाताईंना नाही तर भारतासाठी असल्याचे सांगून त्यांनी भाजपाला मतदानाचे आवाहन केले. तुतारीची पिपाणी कशी करायची हे जनतेला ठावूक असल्याचेही म्हणाले .
भुसावळातील अतिक्रमितांचा घरकूल प्रश्न सोडवणार : भुसावळात मंत्री गिरीश महाजनांची ग्वाही – भुसावळातील रेल्वे हद्दीतील अतिक्रमण हटवल्यानंतर विस्थापीत झालेल्या रहिवाशांना अद्याप घरकुल मिळाले नसल्याने लवकरच हा तिढा सोडवण्यात येईल, अशी ग्वाही मंत्री गिरीश महाजन यांनी भुसावळात दिली. तसेच खासदार रक्षा खडसे यांना एक लाखांचा लीड भुसावळकरांनी द्यावा, असे आवाहन त्यांनी या वेळी केले. देश आता स्वयंपूर्ण झाला असून देशातच संरक्षण उत्पादने तयार होवून त्यांची निर्यात होत असल्याचे ते म्हणाले. सक्षम हातात देशाचे नेतृत्व असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विजयी करावे यासाठी खासदार रक्षाताई यांना मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले.
प्रसंगी रक्षा खडसे यांनी मतांची मागणी करीत विरोधक आपल्याला दहा वर्षात काय केले म्हणून विचारत आहेत मात्र गत दहा वर्षात रस्त्यांची कनेक्टीव्हीटी वाढवली, रस्त्यांचे जाळे मजबूत केले, महिला सक्षमीकरण केले व रेल्वे स्थानकांचा विकास केला, माझ्या दहा वर्षाच्या कार्यकाळात मी अनेक महत्वाच्या कामांना गती दिली असून आज याचा लेखा-जोखा जनतेसमोर मांडला आहे. असे सांगत केलेल्या कामाचा पाढा यावेळी सभेत खासदार रक्षा खडसे यांनी वाचला . यावेळी रक्षाताई म्हणाल्या की, २०१९ मध्ये आम्ही विरोधात असताना आंदोलन केल्यानंतर केळीबाबतचे निकष बदलले तेव्हा का जाग आली नाही विरोधकांना ? असा प्रश्न त्यांनी केला. कोरोनातही जनतेला घरी बसून काम करता आले ही डिजिटल इंडियाची मोदींमुळे उपलब्धी असल्याचे त्या म्हणाल्या.
यावेळी आमदार संजय सावकारे यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की भुसावळातील प्रलंबित प्रश्न सुटण्याची आशा काँग्रेस केवळ भाजपाकडून संविधान बदलले जाणार, अशा खोट्या वल्गना करून मतदारांची दिशाभूल करीत आहे मात्र सर्वात जास्त संविधानात बदल काँग्रेस काळात झाल्याचे सांगून मोदीजीनी आजपावेतो आंबेडकरी जनतेकरिता केलेले कार्याची थोडक्यात माहिती दिली आमदार संजय सावकारे म्हणाले की, सुमारे ५०० वर्षानंतर रामलल्ला अयोध्येत विराजमान झाले हे मोदी सरकारची मोठी उपलब्धी आहे. भुसावळातील अमृत योजनेसह एसआरपीएफ प्रशिक्षण केंद्र, बस पोर्ट, एमआयडीसी, भुयारी गटारींंचा प्रश्न मार्गी लावण्याची अपेक्षा त्यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून व्यक्त केली.
आमदार म्हणाले की, विरोधक नेहमीच ईडीवर टिका करतात मात्र जे चुकीचे करणार त्यांच्यावर कारवाई ही होणार असल्याचे आमदार म्हणाले. उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या माध्यमातून एक हजार कोटींची कामे झाल्याचे ते म्हणाले. ५४० कोटींची वरणगाव-तळवेल योजना व अडीचशे कोटीतून रस्त्यांची कामे झाल्याचे त्यांनी सांगून भुसावळातील प्रलंबित प्रश्न सुटण्याची अपेक्षा फडणवीस यांच्याकडून व्यक्त केली.


