संतांचे वर्णन करण्यासाठीच श्रीकृष्णाने सांगितली अर्जुनाला गीता : हभप चैतन्य महाराज देगलूरकर यांचे प्रतिपादन

भुसावळ – निवृत्तीनाथ कळायचे असतील तर ज्ञानोबा झाले पाहिजे. ज्ञानोबासाठी एकनाथ महाराज, एकनाथ महाराजांसाठी तुकोबा तर तुकोबाराय कळण्यासाठी निळोबा झाले पाहिजे. कारण भक्ताचा महिमा हा भक्तच जाणत असतो. संतांचे वर्णन करण्याचा प्रयत्न देवानेही केला आहे. किंबहुना श्रीकृष्णाने अर्जुनाला श्रीमद् भगवद् गीता ही संतांचे वर्णन करण्यासाठीच सांगितली असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध कीर्तनकार हभप चैतन्य महाराज देगलूरकर यांनी केले.

भुसावळ तालुक्यातील साकरी येथील हभप सदाशिव महाराज यांच्या मातोश्री वै. सरस्वतीबाई रावजी मोरे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित कीर्तन सेवेत ते बोलत होते. सेवेसाठी त्यांनी जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा तुम्ही संत मायबाप कृपावंत हा अभंग चिंतनास घेतला. यावेळी ते म्हणाले की, जगाला सुखाने झोप लागावी अशी व्यवस्था करून ठेवतो तो संत असतो. जन्माला आल्यावर देव, ऋषी व आईवडिलांचे ऋण खेळणे गरजेचे असते. हे ऋण फेडण्याचा प्रयत्न करणे म्हणजे पुरुषार्थ होय. सर्व संतांचा प्रपंच वेगळा परंतु परमार्थ एक होता. परमार्थ हा प्रयत्नाने सिद्ध होतो. म्हणून ऋण फेडण्याचा उत्तम मार्ग म्हणजे कीर्तन होय. श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता कशासाठी सांगितली हे सर्वांना माहिती असले तरी आपण वेगळा विचार केला तर संतांचे वर्णन करण्यासाठीच गीता सांगितली असल्याचे अध्यायनिहाय स्पष्ट होते. गीतेत स्थितप्रज्ञ, कर्मयोगी, योगी, विभूती, दैवीसंपत्तीवान अशा संतसज्जनांचे वर्णन आलेले आहे. शेवटच्या अठराव्या अध्यात एकत्रितरीत्या या सगळ्यांचा उहापोह आला आहे. देवालाही संतांचे वर्णन करणे जमले नाही. कारण भक्ताचा महिमा हा भक्तच जाणत असतो. देव, माया, त्रिपुटी, भक्ती व संत महात्मे हे अवर्णनीय, अनिर्वचनीय आहेत. त्यामुळे त्यांचे महत्त्व सांगण्यासाठी उपमान प्रमाण वापरून समानता सिद्ध करत राहणे हेच करावे लागते. एका शब्दाच्या पलीकडे ज्याचे उत्तर नसते त्याला त्रिपुटी असे म्हणतात. जगद्गुरु तुकाराम महाराज यांनी संतांना चंदनाच्या गुणाप्रमाणे संबोधले आहे. संतांचे वर्णन त्यांनी गुणात्मक कर्तुत्वात्मक आत्मीयतेने व तुलनात्मक असे चार प्रकारे केले आहे. गुणात्मक वर्णन केल्याने प्रेम वाढते. आत्मियतेने वर्णन केल्याने समर्पणाची भावना वाढते. मायबापाकडे श्रद्धा, आत्मविश्वास व आत्मियता असल्याने संत हे मायबापासारखे असल्याचे तुकोबांनी सांगितले आहे. ज्ञानोबा-तुकोबांकडे नम्रतेची पराकाष्ठा होती. ज्ञानोबा-तुकोबा हेच आपल्या जीवनाचे कल्याण करतील. त्यामुळे आपण सर्वांनी संतसेवेकडे प्रवृत्त झाले पाहिजे. त्यासाठी प्रत्येकाने दररोज ज्ञानेश्वरी, तुकोबांचा गाथा व रामकृष्णहरी भजन यासाठी किमान पंधरा मिनिटे वेळ द्यावा, असे आवाहन हभप चैतन्य महाराज देगलूरकर यांनी आपल्या कीर्तनात केले. कीर्तनसेवेचा लाभ घेण्यासाठी हजारो भाविक उपस्थित होते.