मनवेल ता.यावल- केंद्र सरकारच्या टपाल सेवेत कार्यरत साकळी येथील रहिवाशी असलेल्या एका ३२ वर्षीय तरुणाने दि.१४ रोजी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली आहे.घडलेल्या या दुदैवी साकळीसह परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून आत्महत्येचे कारण अद्यापपर्यंत अस्पष्ट आहे. मात्र आपल्या नोकरी ठिकाणच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मानसिक त्रासापायी सदर तरुणाने आत्महत्याचे टोकाचे पाऊल उचलेले असल्याची दबक्या आवाजात चर्चा.
सदर घटनेबाबत समजलेली माहिती अशी की,साकळी ता.यावल येथील हनुमान पेठ भागातील रहिवासी असलेला निखिल रविंद्र परिस्कर (कुंभार) (वय ३२) हा गेल्या जवळपास दहा-अकरा वर्षापासून केंद्र सरकारच्या टपाल (पोस्ट)विभागात नोकरीला होता.गेल्या तीन ते चार वर्षापासून निखिलला आपल्या नोकरीच्या ठिकाणी वरच्या पदावर बढती मिळालेली होती. किनगाव ते चोपडा तालुक्यातील आठ ते दहा खेड्यांमधील टपाल कार्यालयात व्हीजीट अधिकारी म्हणून त्याला तपासणीला जावे लागत असे. निखिल हा अतिशय मनमिळावू,विनम्र,भावनिक तसेच मित्र परिवाराचा चाहता होता.नोकरी व आपले घर हाच त्याचा दैनंदिन क्रम होता.तो आई,वडील,पत्नी व मुलासह सुखी असे कौटुंबिक जीवन होता.

दरम्यानच्या काळात निखिल हा काहीतरी एका मोठ्या मानसिक टेन्शनमध्ये राहत होता. निखिलने या त्रासाबाबत आपल्या आई-वडिलांना सांगितले होते.त्यांचे वडील संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून यातून लवकरच मार्ग काढणार होते.मात्र त्या अगोदरच निखिलने जगाचा अखेरचा निरोप घेतला. दि.१४ रोजी निखिल हा नोकरीनिमित्ताने नेहमीप्रमाणे सकाळी घरातून निघाला व त्याला चोपडा तालुक्यातील काही टपाल कार्यालयांना भेटी देण्याच्या कामानिमित्ताने तो चोपड्याकडे गेलेला होता. दरम्यान संध्याकाळच्या वेळी अंदाजे ५.३० ते ६ वाजता निखिलने चोपडा-हातेड रस्त्यावरील काजीपुर गावाजवळी पुलाखाली दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे दिसून आले.
सदर घटनेच्या अगोदर नैराश्याच्या भावनेने निखिलने आपल्या काही मित्रांना फोनने लोकेशन टाकून व फोन करून ‘मी आत्महत्या करीत आहे,आता मी तुम्हाला पुन्हा भेटणार नाही ‘सांगितले.मेसेज बघताच अगदी तात्काळ मित्रांनीही त्याची शोधाशोध करायला सुरुवात केली.मात्र निखिलचा फोन स्विच ऑफ झाल्याने ते सर्व जण अपयशी ठरले.अखेर क्रुर नियतीने निखिलचा घात केला.त्याने त्याची मोटारसायकल घटनास्थळी पुलाच्या वर लावलेली होती
.दि.१५ रोजी त्याच्या मृतदेहावर अतिशय शोकाकुल वातावरणात साकळी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.अंत्ययात्रेच्या वेळी कुटुंबाचा हृदय पिळून सोडणारा आक्रोश होता. सदर घटनेने साकळीसह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे..मयत निखिलच्या पश्चात आई,वडील,पत्नी,एक चार वर्षांचा मुलगा,दोन लहान भाऊ असा परिवार आहे.


