भुसावळ – तालुक्यातील कंडारी येथे पूर्ववैमनस्यातून दोघ सख्ख्या भावांचा धारदार शस्त्राने भोसकून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली असता अचानक मध्यरात्री 1 ते दीड वाजेचे सुमारास पाठोपाठ शहरात कुविख्यात गुंड निखिल राजपूत याचा खून झाल्याने या तिहेरी खुनाने शहरासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

सविस्तर वृत्त असे की, कंडारी येथे पूर्ववैमनस्यातून दोघ सख्ख्या भावांचा धारदार शस्त्राने भोसकून निर्घृण हत्या शांताराम भोलानाथ साळुंखे (३३) व राकेश भोलानाथ साळुंखे (२८) अशी मयतांची नावे आहेत. या गुन्ह्याचा तपास सुरु होत नाही, तो मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास कुविख्यात गुंड निखील राजपूतचा देखील खून झाला. एकाच रात्री एकामागून एक तब्बल तीन खून झाल्यामुळे तालुक्यासह जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.
कंडारी गावातील शांताराम साळुंखे व राकेश साळुंखे या भावंडांचा गावातील एक परीवाराशी जुना वाद असून त्या वादाची ठिणगी शुक्रवारी पडल्यानंतर हल्लेखोरांनी भावंडांवर हल्ला चढवला.या हल्ल्यात तलवारीसह चाकूचा सपासप वापर करण्यात आल्याने दोन्ही भावंड जागीच गतप्राण झाली तर इंगळे व साळुंखे नामक इसम जखमी झाला असून त्यांना ट्रामा केअर सेंटरला हलवण्यात आले असून त्यातील एकाची प्रकृती गंभीर असल्याचे सूत्रांनी सांगितले
.कंडारीतील दुहेरी खुनाची घटना समोर आल्यानंतर भुसावळ शहरचे पोलीस निरीक्षक गजानन पडघण व बाजारपेठचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी ट्रामा सेंटरमध्ये रवाना करण्यात आले असून हल्लेखोरांची माहिती काढण्याचे काम यंत्रणेने सुरू केले आहे. पोलिसांना आतापर्यंत संशयित म्हणून दीपक छगन तायडे व मनोज मोरे यांची नावे कळाली असून त्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे.
पोलिसांच्या रेकॉर्डवरील कुविख्यात गुन्हेगार म्हणून निखील राजपूतची ख्याती होती शिवाय यापूर्वी त्याच्यावर हद्दपारीची कारवाई देखील करण्यात आली होती. पोलिसांच्या अंगावर हात टाकण्यासह धमकी देणे, खंडणी वसुल करणे, मारहाण करणे यासह गंभीर गुन्ह्यात निखील राजपूत हा प्रमुख संशयित आरोपी होती. शहरातील श्रीराम नगराजवळील पाण्याच्या टाकीजवळ त्याचे वास्तव्य होते. शुक्रवारी रात्री निखील हा घरी आल्यानंतर काही संशयितासोबत पाण्याच्या टाकीच्या टेरेसवर झोपला असता त्याचा वाद झाला व वादातून त्याच्या गळ्यावर चाकूचे सपासप वार करीत खून करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. एका संशयिताचे नाव निष्पन्न झाले असून कौटुंबिक वादातून त्याने हा खून केल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे २४ तासांपूर्वीच निखीलसह त्याच्या सहकाऱ्यांनी बाजारपेठ पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.
खुनाची घटना समोर आल्यानंतर जळगाव पोलीस उपअधीक्षक संदीप गावीत, एलसीबी पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील, भुसावळ शहरचे पोलीस निरीक्षक गजानन पडघण व बाजारपेठचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. श्रीराम नगर भागातील पाण्याच्या टाकीवर रक्ताच्या थारोळ्यात निखील राजपूतचा मृतदेह आढळला आहे.


