भुसावळ : भुसावळ पालिकेचे ब्रॅण्ड अॅम्बेसेडर तथा पर्यावरण मित्र नाना पाटील यांनी आपल्या कल्पतेतून तोडण्यात आलेल्या झाडाच्या फांद्याद्वारे 145 रोपे तयार केली असून आगामी पावसाळ्यात या रोपांची लागवड करून त्यांना जगविण्याचा निर्धार केला आहे. शहरात वीज वितरण कंपनीतर्फे वीज तारांना अडथळा तोडणार्या झाडाच्या फांद्या स्पार्किंग टाळण्यासाठी तोडल्या जात आहेत मात्र तोडलेल्या फांद्या जमिनीवर आल्यानंतर त्यातून त्यांचे योग्य पुर्नरोपण केल्यास ही रोपे जगतील, असा विश्वास नाना पाटील यांनी व्यक्त केला आहे.

फांद्यापासून तयार केली 145 रोपे
भुसावळात गत चार ते पाच दिवसांपासून विजेच्या तारांना अडथळा ठरणार्या झाडांच्या फांद्या छाटल्या जात आहेत. जामनेररोडवरील आहिल्या देवी कन्या शाळेतही वडाचे झाडाच्या फांद्या छाटण्यात आल्या. छाटलेल्या फांद्या तशाच पडून असल्याने पर्यावरण अभ्यासक नाना पाटील यांना वडाच्या झाडाच्या चार ते पाच फुट उंचीच्या फांद्यांचेही जमिनीत किंवा पिशवीत रोपण केले तर त्यांना पालवी फुटून रोपे जगत असल्याचे ठावूक असल्याने त्यांनी तोडलेल्या झाडाच्या फांद्याचा वापर करुन 145 रोपे तयार केली. पावसाळ्यात ती शहरातील विविध भागात लावली जाणार आहेत.
विद्यार्थिनींनी केले श्रमदान
अहिल्यादेवी शाळेत यापूर्वी 650 रोपांची रोपवाटीका तयार करण्यात आली होेती. या रोपवाटीकेतील काही झाडे मे महिन्यात सुकली. याच झाडांची पिशव्या व मातीचा वापर करीत आता वडाच्या झाडांच्या फांद्या जगविण्याचा व्यापक प्रयत्न झाला आहे. या उपक्रमासाठीही अहिल्यादेवी कन्या शाळेतील विद्यार्थीनींनी श्रमदान केले. या उपक्रमातून विद्यार्थीनींनी कार्यानुभव व नवीन काही शिकण्याचा आनंद घेतला.
शहरात असे प्रयोग गरजेचे
एकीकडे वृक्षांचा र्हास होत आहे. शाळेच्या आवारात महावितरणने तोडलेल्या झाडाच्या फांद्या पाहून टाकाऊतून टिकाऊची संकल्पना सूचली. ज्या भागात वड, पिंपळ व औदुंबराची छाटणी होत असेल तर अशा वृक्षांची लगेच रोपवाटिका किंवा रोप तयार केले तर ती लवकर जगतात व त्या फांद्या वायाही जात नाही. यामुळे शहरात असे प्रयोग होणे गरजेचे असे पर्यावरणतज्ज्ञ नाना पाटील म्हणाले.


