वरणगावातील ढापे दुरुस्तीसह कचरा दररोज उचला; बस स्टॅन्ड चौकातील पाणी साचलेल्या खड्यात तात्काळ मुरूम टाकण्याची मागणी :

वरणगाव – शहरात बऱ्याच ठिकाणी गटारी वरील ढापे तुटले आहे, दररोज घंटा गाडी येत नसल्यामुळे जागोजागी कचरा साचुन दुर्गंधी पसरली आहे. बस स्टँड चौकातून गावात येणाऱ्या मुख्य रस्त्यावर पाण्याचे मोठे तळे झाले असून वाहनामुळे खड्यातील पाणी नागरिकांच्या अंगावर उडून वादाचे प्रकार घडत आहे. या सर्व समस्या दोन दिवसात सोडवा अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना शहरप्रमुख संतोष माळी यांच्यासह शिवसैनिकांनी आज शुक्रवारी न. प. च्या मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

शिवसेनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, ऐन पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वरणगाव शहरात नागरी समस्यांचा खूप मोठा डोंगर झाला आहे. यामध्ये गावात आणि कॉलन्यामध्ये गटारी वरील ढापे तुटलेले आहे. ढापे तुटल्यामुळे गटारीचे पाणी वरती येऊन वाहनधारकांवर पादचाऱ्यांना जाणे-येणे मुश्‍किल झाले आहे. तसेच बस स्थानकावरून गावात येणारा मुख्य रस्त्यावर रिक्षा स्टॉप जवळ पाण्याचे मोठे तळे साचले आहे. या खड्ड्यातून दररोज शेकडो दुचाकी चारचाकी वाहने जात येत असता या खड्ड्यातून वाहने जाताना त्यातील पादचाऱ्यांच्या अंगावर पाणी उडून शाब्दिक वादविवादाचे प्रकार वाढले आहे. शाळकरी मुले-मुली याच रस्त्यावरून शाळेत जातात त्यांच्या अंगावर देखील या खड्ड्यातील पाणी उडल्यामुळे शाळेचा युनिफॉर्म खराब होतो. या पाणी साचलेल्या खड्ड्यात न.प. प्रशासनाने त्वरित मुरूम टाकावा. तसेच शहरात घंटागाड्या दररोज येत नसल्यामुळे सर्वत्र कचरा उघड्यावर पडून दुर्गंधी सुटली आहे. यामुळे नागरिकांसह लहान मुले आजारी पडत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. शहरातील या सर्व समस्या येत्या चार दिवसात नाही सुटल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा शहरप्रमुख संतोष माळी यांच्यासह शिवसैनिकांनी निवेदनातून दिला आला आहे.

निवेदनावर जिल्हा संघटक विलास मुळे, उपतालुका प्रमुख सुभाष चौधरी, शहरप्रमुख संतोष माळी, मुस्लिम समाजाचे नेते सय्यद जाफरअली (हिप्पीशेठ), अल्पसंख्याक तालुका संघटक मोहसीन खान, उपशहर प्रमुख अशोक शर्मा, माजी उपशहरप्रमुख सुनील भोई, नितीन देशमुख, माजी ग्रा. पं. सदस्य विलास वंजारी, आबा सोनार, अमर सोनार, उमाकांत झांबरे, शिवा भाई, अतुल पाटील, सागर वंजारी, राहुल वंजारी, वैभव लोखंडे, अबूबकर खान, दिपक शेडके यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

-अन्यथा मुख्याधिकारीच्या खुर्चीला घालणार हार

वरणगाव शहरात ऐन पावसाळ्यात नागरी समस्यांचा डोंगर उभा असल्याने नगरपरिषद प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही आहे. तसेच मुख्याधिकारी समीर शेख हे देखील कार्यालयात येत नाही. राज्यात सर्व दूर पावसाने कहर केल्यामुळे शासनाने मुख्याधिकार्‍यांना निवासी थांबण्याचे आदेश दिल्यानंतरही वरणगाव नगरपालिकेचे सिओ कार्यालयात येत नाही. चार दिशा नागरी समस्या नाही सुटल्यास पाचव्या दिवशी मुख्याधिकारी यांच्या खुर्चीला हार घालण्याचा इशारा देखील शहरप्रमुख संतोष माळी यांनी दिला आहे.