संत मुक्ताईंच्या ताटीच्या अभंगातील मानवतावाद – डॉ. जगदीश पाटील

*श्रीक्षेत्र मेहूण तापीतीर (ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव) येथे श्रीसंत आदीशक्ती मुक्ताई शके 1219 मध्ये वैशाख वद्य दशमीच्या दिवशी गुप्त झाल्या. या घटनेला बुधवार, दि. 25 मे 2022 रोजी 725 वर्षे पूर्ण होत आहेत. या घटनेच्या सप्त शतकोत्तर रौप्य महोत्सवानिमित्त संत मुक्ताई यांच्या विषयी घेतलेला थोडक्यात आढावा*………..

*संत मुक्ताईंच्या ताटीच्या अभंगातील मानवतावाद*…

जगाचा उद्धार करून मानवतावाद जोपासण्यासाठी श्रीमुक्ताईदी भावंडे साक्षात अवतीर्ण झाल्याचे संत जनाबाईने म्हटले आहे. निवृत्तीनाथ, ज्ञानेश्‍वर, सोपान व मुक्ताबाई या चारही भावंडांच्या वडिलांनी म्हणजेच विठ्ठलपंतांनी संन्यास घेवून गृहस्थाश्रमात प्रवेश घेतला होता. त्यानंतर विठ्ठलपंत आणि रूक्मिणी यांना ही चार मुले झाली होती. पुढे दुर्दैवाने मातापित्यांच्या देहत्यागानंतर ही भावंडे पोरकी झाली. काही दिवस आपेगावी राहून नंतर आळंदीला येवून राहू लागली. एके दिवशी संत ज्ञानेश्‍वरांच्या दर्शनामुळे एका कर्मठ ब्राह्मणाने कपड्यांसहीत अंघोळ केली. या गोष्टीचा राग येवून संत ज्ञानेश्‍वर आपल्या झोपडीचे दार बंद करून आतमध्ये दुःख करीत बसले. थोड्या वेळाने मुक्ताई येवून पाहतात तर झोपडीचे दार बंद होते. मुक्ताईंना समजायला काहीही वेळ लागला नाही. आपल्या ज्ञानेश्‍वरदादांचा राग शांत करण्यासाठी मुक्ताईंनी अतिशय लडिवाळपणे, प्रेमळ भावनेने, कोमल वाणीने त्यांची समजूत काढली. मुक्ताईंची हिच समजूत अकरा अभंगांची असून त्यांनाच ताटीचे अभंग असे म्हणतात. या ताटीच्या अभंगांतून ज्ञानेश्‍वरांचा राग शांत करण्याबरोबरच अखिल विश्‍वाचे कल्याण करणे कसे गरजेचे आहे हे मुक्ताईंनी पटवून दिले आहे. त्यातून संपूर्ण जगात शांतता प्रस्थापित होण्यासाठी मानवतावादाची कशी गरज आहे हे सिद्ध होते. ताटीच्या अभंगांतील एक-एक शब्द मानवतावादाला धरून आहे. पहिल्याच अभंगांत मुक्ताई म्हणतात,

विश्‍वपट ब्रह्म दोरा | ताटी उघडा ज्ञानेश्‍वरा ॥

आपण तर पावन मनाचे योगी आहात. लोकांच्या शब्दरूपी शस्त्रांनी आपल्याला दु:ख होणारच परंतु संतवृत्तीने त्याचे वाईट न वाटता आपल्या मनाला बोध करून देण्याचा हा प्रयत्न आहे असे मानायचे असते. सर्व काळ असणारे जे अद्वैत ब्रह्म आहेत ते आपणच आहोत असे मानल्यानंतर त्यांना तिन्ही लोकांत भेद कशाचा? असा प्रश्‍न उपस्थित करून मुक्ताईंनी मानवतावादाची एक मोठी झलक दाखवून दिलेली आहे. पुढे त्या म्हणतात, जे समदृष्टी ठेवणारे आहेत त्यांच्या ठिकाणी एक थोर आणि एक नीच हा भेद येणार कुठून?
सुख सागरी वास झाला | उंच निच काय त्याला ॥

जसे आपण होण्याचा प्रयत्न करू तसेच देव आपल्याला करीत असतो. जशी दृष्टी तशी सृष्टी आपण जर सर्व ठिकाणी ब्रह्मतत्वाचे स्वरूप पाहू लागलो तर सर्व जगच आपल्याला ब्रह्मरूपच दिसू लागते, हे पटवून देण्यासाठी मुक्ताई उदाहरणादाखल सांगतात,

ऐसा नटनाट्य खेळ | स्थिर नाही एक वेळ ॥

नाटकातील नट जसा वेळोवेळी वेगवेगळ्या भूमिका स्विकारतो आणि त्या भूमिका स्विकारल्याने तो जसा स्थिर राहत नाही. अगदी त्याचप्रमाणे जे आत्मसुखाच्या ठिकाणी स्थिर झालेले आहेत त्यांना भेदाभेद करण्याचे कारणच उरत नाही.

एकापासून अनेक झाले | त्यासी पाहिजे सांभाळीले ॥

विश्‍वात्मक अशा ब्रह्मस्वरूपात कोणी कोणाचा राग धरावा व कोणी कोणाच्या अज्ञानाची चिंता करावी असे विचारून मुक्ताई ज्ञानेश्‍वरांना चिंता, क्रोध मागे सारून ताटी उघडण्याची विनंती करीत आहेत. सर्व विश्‍वात्मक ब्रह्म असल्याचे सांगून ते स्पष्ट करून सांगतांना मुक्ताई म्हणतात,

ब्रह्म जैसे तैशापरी | आम्हां वडिल भूते सारी ॥

आपलाच हात आपल्यालाच लागला तर आपल्याला त्याचा कधी राग आला आहे का? किंवा आपली जीभ आपल्याच दातांनी चावली तर आपण कधी आपलीच बत्तीशी पाडली आहे का? ज्यांना आपण आपले मानले त्यांचा कधी राग धरायचा नसतो. स्वतः आपण सुखाचा सागर होवून जगाला मार्गदर्शन करीत त्यांचा उद्धार करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे हे सांगतांना मुक्ताई म्हणतात,

सुखसागर आपण व्हावे | जग बोधे निववावे ॥

आपणच विश्‍व आहोत तर जन म्हणून जे आहेत ते सर्व जनार्दनच आहेत. चंद्र पाहायचा झाल्यास त्याच्या कला वेगळ्या करण्याची जशी गरज भासत नाही तसे जगाला पलीकडे सारून परमात्म्याला पाहावे. कारण तो सर्वाभूती आहे. जन तेचि जनार्दन मानल्यावर दुःख देणार्‍या घटना, व्यक्ती यांच्यावर दया, क्षमा यांचे पांघरून घालावे व विश्‍व कल्याणासाठी बाहेर यावे, अशी कळकळीची विनंती मुक्ताई यांनी केली आहे. परमेश्‍वराच्या सत्तेनेच हे सर्व विश्‍व चाललेले असतांना कोणी एकाने काही केले म्हणून रागलोभाचा प्रश्‍न निर्माण होणार तरी कसा? यासाठी

अवघी ईश्‍वराची करणी | काय तेथे केले कोणी ॥

हे तत्व ज्याला समजले त्याने कोणत्याही संभ्रमात पडू नये. गंगा नदीचे पाणी ज्याप्रमाणे जगाचे पाप-ताप नाहीसे करत आणि काठावरील झाडांचे पोषण करीत समुद्राला जावून मिळते. त्याप्रमाणे अविद्येने ग्रासलेल्या व भवसागरात अडकलेल्या लोकांच्या संकटांचे निवारण करत त्याचे सुख वाढवणे हेच आपले अवतार कार्य असल्याचे मुक्ताईंनी ज्ञानेश्‍वरांना पटवून दिले. जगात शांतता नांदून लोकांचा उद्धार व्हावा अशी मुक्ताईंची तळमळ दिसून येते. ?आपण आपल्यापुरते पाहाणे हे योग्य नसून तसे केल्यास आपल्या अलौकिकतेला कलंक लागेल. आपण निश्‍चित केलेल्या विशाल जीवनकार्याचे स्मरण करून देत मी आपल्याला ताटी उघडून बाहेर येण्याची विनंती करीत आहे आणि विश्‍वाच्या कल्याणासाठी
झटण्याकरीता घरगुती समजूत काढत आहे. आपल्याला हे विश्‍वतत्व समजले आहेच मात्र तुमच्याबरोबर जगाचादेखील उद्धार करून त्यांना या संसार सागरातून तरून न्यावे, अशी जगाची काळजी वाहून नेण्याचे काम मुक्ताई यांनी ताटीच्या अभंगातून केलेली आहे.

तुम्ही तरूनी विश्‍व तारा | ताटी उघडा ज्ञानेश्‍वरा ॥

ताटीच्या अभंगांमधील मोजके पण अर्थपूर्ण शब्द आणि प्रत्येक अभंगाच्या शेवटी आग्रहपूर्वक केली जाणारी ताटी उघडा ज्ञानेश्‍वरा ही आळवणी यामुळे ज्ञानेश्‍वर ताटी उघडून बाहेर आले. मुक्ताईंना जवळ घेवून प्रेमाने कौतुक केले. त्यानंतर श्रीमद्भगवतगीतेवर टीका करणारा ज्ञानेश्‍वरी हा जगतमान्य ग्रंथ लिहीला. ज्ञानी व योगी भाऊ आणि मानवतावाद जोपासणारी बहिण यांचा संवाद जगाला सकारात्मक दिशा देणारा आहे. संत आदिशक्ती मुक्ताई शके 1219 मध्ये वैशाख वद्य दशमीच्या दिवशी महत्नगर (सध्याच्या श्री क्षेत्र मेहूण, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव) येथील तापीतीरावर 17 वर्षे, 7 महिने व 24 दिवसांच्या असतांना तिरोभूत झाल्या. या घटनेला बुधवार, दि. 25 मे 2022 रोजी 725 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त संत आदिशक्ती देवस्थान श्री क्षेत्र मेहूण तापीतीर येथे तिरोभूत सोहळा होत आहे.

(प्रासंगिक लेख – लेखक डॉ. जगदीश पाटील, भुसावळ )8149498020)