१० एकरवरील ऊस जळून खाक; तालुक्यातिल वेल्हाळा येथील घटना : महावितरणच्या बेभरवशाच्या कारभारामुळं गरीब शेतकऱ्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी ;


भुसावळ (प्रतिनिधी) : अतिवृष्टी, हमीभाव या संकटांचा सामना करत असतानाच शेतकऱ्यांवर आणखी एक संकट चालून आलं आहे. महावितरणच्या बेभरवशाच्या कारभारामुळं शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. शॉर्टसर्किटमुळं ऊसाच्या शेतात आग लागल्याच्या घटना राज्यभरात घडत आहेत. भुसावळ तालुक्यातील वेल्हाळा शेतशिवारातील १० एकरातील ऊस जळून खाक झाल्यामुळे ३ शेतकऱ्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी झाली आहे.ऊसतोडणीचा हंगाम चालू होण्याची लगबग असतांनाच या संकटामुळे पुन्हा परिसरातील शेतकरी संकटात सापडला आहे.

शॉर्ट सर्किटमुळं आग लागून १० एकर ऊस जळाल्याची घटना वेल्हाळा या गावात घडली आहे. ऊसाच्या तोडणीची लगबग सुरू झालेली असतानाच आज (दि. ११) सकाळी अकरा वाजेच्या सुमारास रमेश वामन राणे यांचे स्वतः चे आणि त्यांनी आशाबाई श्रीधर पाटील (गट ११२), रश्मी भूषण राणे (गट ११३), मधुकर चौधरी (गट ११४)यांचे कडून नफ्याने तयार करण्यासाठी घेतलेले शेती असे एकूण 10एकर उस लावलेल्या शेतातील इलेक्ट्रिक डीपीला आग लागली. त्यामुळे बघता बघता १० एकरातील ऊस जळून खाक झाला. जोरदार वाऱ्यामुळे आग अधिक पसरली.

आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करत ही आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र वाऱ्यामुळं आग अधिक पसरत असल्यामुळे गावकऱ्यांनी अग्निशमन दलाशी संपर्क साधला
भुसावळ पालिका अग्निशामन दलाच्या संजय जावळे, व त्या परिसरातील आजूबाजूच्या सर्व शेतकऱ्यांनी, सकाळी दहा ते दुपारी दोन ते अडीच पर्यंत ही आग चालू होती. आग नियंत्रणात आली नाही पण ती ऑटोमॅटिक हवेच्या माध्यमातून विझली. भुसावळ नगरपालिका अग्निशमन दलाच्या कर्मचार्‍यांनी जवळपास आग विझवण्यात प्रयत्न केला परंतु तोपर्यंत बघता बघता १० एकरवरील ऊस जळून खाक झाला होता. या आगीत साधारण १० लाखांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
दरम्यान, महावितरणचे धनंजय धांडे, कविता सोनवणे तर तलाठी बाळासाहेब गायकवाड यांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला.
याच शिवारात एमएसईबीच्या सोनवणे मॅडम यांना या परिसरातील शिवारातील शेतकऱ्यांनी वारंवार लोम्बकळणाऱ्या तारा आणि डीपी बद्दल तक्रारी केल्या होत्या. मात्र त्यांनी तेथील शेतकऱ्यांच्या कोणीच तक्रारी आज पावेतो ऐकल्या नसल्याने सदर शिवारात ही तिसरी घटना आज घडली व या संदर्भात शेतकर्‍यांनी त्यांच्याशी विचारणा केली असता त्यांनी शेतकऱ्यांची हुज्जत बाजी केल्याचे समजते तसेच सबंधित अधिकारी शेतकऱ्यांच्या समस्याकडे दुर्लक्ष करतात असा तेथील शेतकऱ्यांचा आरोप आहे.