भुसावळ – इंजिनीअरिंगला जाऊ इच्छिणाऱ्या बहुतांश विद्यार्थ्यांमध्ये विविध विद्याशाखांबाबत अनभिज्ञता असते. नेमकी कोणती विद्याशाखा निवडायची, त्या शाखेतून पुढे नोकरीच्या नेमक्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. आपल्या विषयातल्या आवडीनुसार व क्षमतेनुसार शाखेची निवड करावी. अधिक क्षेत्रात रोजगारांच्या संधी हव्या असल्यास मूळ शाखांची निवड योग्य ठरतं. उदा. यंत्र अभियांत्रिकी अर्थात मेकॅनिकल इंजिनीअरिंग. स्पेशलाइज्ड शाखांची निवड पदवीच्या वेळेस केल्यास आपल्या रोजगाराच्या संधी त्या शाखेपुरत्याच मर्यादित राहतात. उदा. ऑटोमोबाइल इंजिनीअरिंग शाखेची निवड केल्यास केवळ वाहन उद्योगापुरतच्या नोकरीच्या संधी मर्यादित राहतात. त्याऐवजी मेकॅनिकल इंजिनीअरिंगची निवड केल्यास पुढे एरोस्पेस, मरिन, ऑटोमोबाइल, रेफ्रिजरेशन, प्रॉडक्शन, ऑटोमेशन, रोबोटिक्स यांसारख्या अनेक इंजिनीअरिंग क्षेत्रांत रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात.
मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये यंत्र व यंत्रप्रणाली चालवण्यासाठी औष्णिक व यांत्रिक ऊर्जेचा वापर करण्याच्या दृष्टीने रचना करणं व त्याचं विश्लेषण करणं या गोष्टींचा समावेश होतो. या क्षेत्रातले अभियंते सर्व प्रकारच्या यंत्राची रचना, चाचणी, निर्मिती व ती कार्यरत करण्याचं काम करतात. मेकॅनिकल इंजिनीअरिंगचं क्षेत्र पुढील दोन प्रकारांत विभागलेलं दिसतं-

१. यंत्रं, यंत्रांची रचना (मेकॅनिझम), साहित्य (मटेरिअल्स), जलशक्ती (हायड्रॉलिक्स) व हवेची शक्ती (न्यूमॅटिक्स)
२. कार्य व ऊर्जा, उष्णता, वायुविजन (व्हेंटिलेटिंग) व वातानुकूलन (एअर कंडिशनिंग)
यातूनच मेकॅनिकलमधील विविध उपशाखांचा उगम होतो.
ऑटोमोबाइल इंजिनीअरिंग – यामध्ये मोटारसायकल, कार, बसेस, ट्रक्स यांसारख्या वाहनांची रचना व उत्पादन केलं जातं.
एरोनॉटिक्स व एरोस्पेस इंजिनीअरिंग- एरोनॉटिक्समध्ये विमानं व अन्य हवेत चालणाऱ्या वाहनांची रचना व निर्मितीचा अभ्यास केला जातो. यामध्ये एरोडायनॅमिक्स, स्ट्रक्चर डिझाइन, प्रोपल्शन इंजिन, नेव्हिगेशन, कम्युनिकेशन आदी विषयांचा समावेश होतो. एरोस्पेस इंजिनीअरिंगचा एरोनॉटिक्सशी जवळचा संबंध आहे. परंतु एरोस्पेस इंजिनीअरिंगमध्ये अवकाशयानं, रॉकेट सायन्स, कृत्रिम उपग्रह यांच्या अभ्यासाचा समावेश असतो. मरिन इंजिनीअरिंग- मरिन इंजिनीअरिंग ही मेकॅनिकल इंजिनीअरिंगची विशेष शाखा आहे. यामध्ये मेकॅनिकल व इलेक्ट्रिकल प्रणालीचा वापर करून जहाज चालवण्याचं तंत्र तसंच जहाजावरील विविध यांत्रिक व विद्युत उपकरणांच्या रचनेचा अभ्यास, त्याची देखभाल यांचा समावेश असतो.
प्रॉडक्शन इंजिनीअरिंग- विविध वस्तूंचं उत्पादन करणाऱ्या उत्पादनविषयक उद्योगामध्ये प्रॉडक्शन इंजिनीअरिंग महत्त्वाची भूमिका पार पाडते. यामध्ये प्रॉडक्शन युनिटची निर्मिती, त्यावरून जे उत्पादन घ्यायचं आहे, त्याचा अभ्यासही येतो. यामध्ये इंडस्ट्रिअल इंजिनीअरिंग, व्यवस्थापन, वेळेचं नियोजन, कॉस्टिंग व एस्टिमेशन, ऑप्टिमायझेशन आदींचा समावेश होतो.
मेकॅनिकल इंजिनीअिरगला कधीही मरण नाहीच. आता या शाखेच्या जवळ जाणाऱ्या काही शाखा उदयास आलेल्या आहेत. प्रोडक्शन इंजिनीअिरग आणि मेकेट्रॉनिक्स इंजिनीअिरग. मेकॅनिकलला अधिक वाव आहेच, पण प्रोडक्शन इंजिनीअिरगमध्येही चांगल्या नोकऱ्या आहेत. मेकेट्रॉनिक्सचं क्षेत्र, तर आताच उदयाला येत असल्यामुळे त्यातही भविष्यात भरपूर संधी असतील. मेकॅनिकल इंजिनीअिरगमध्ये पदव्युत्तर पदवी (एम. ई. / एम.टेक.)घ्यायची असेल तर डिझाइन, अॅनालिसिस, मॅन्युफॅक्चिरग आणि एचव्हीएसी किंवा थर्मल या क्षेत्रात उच्च शिक्षण घेता येतं. ‘डिझाइन’ म्हणजे एखादे उत्पादन कारखान्यात तयार करताना त्याचे विविध सुटे भाग कोणते, त्यांचा आकार किती असावा, ते एकमेकांशी कसे जोडले जातील, ते तयार करण्यासाठी कोणता कच्चा माल वापरावा, वगरे विषयीचे तपशील तयार करणे म्हणजे डिझाइन. या क्षेत्रात काम करताना विविध सॉफ्टवेअरचा देखील उपयोग होत असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना हे गुण कौशल्य आत्मसात व्हावे या दृष्टीने एसएसबीटी महाविद्यालयातील मेकॅनिकल विभागात ऑटोडेस्क इन्वेंटर ,कटिया, ऑटोकॅड, सॉलिड एज, आयडिया इत्यादी सॉफ्टवेअर शिकविले जातात त्या उत्पादनावर कोणकोणती बले कार्यरत असतील, जसे ते वापरात असताना घासलं जाईल का? त्यावर दुसऱ्या एखाद्या भागाचा आघात होईल का, आणि या सगळ्या प्रक्रियांमध्ये ही बले तोलून धरताना त्या उत्पादनाच्या विविध ताकदी किती असतील? वगरेबाबत गणिती विश्लेषण करणे म्हणजे अॅनालिसिस! उत्पादन क्षेत्राशी निगडित विविध प्रक्रियांचा अभ्यास मॅन्युफॅक्चिरग या क्षेत्रात येतो, तर एचव्हीएसी म्हणजे ‘हिटिंग, व्हेंटिलेशन आणि एअर कंडिशनिंग’ ही थर्मल इंजिनीअिरग अर्थात औष्णिक ऊर्जेचे नियंत्रण करणारी शाखा आहे.
या क्षेत्रात स्वयंरोजगार व त्याचबरोबर नोकरीच्या संधीही भरपूर आहेत. या क्षेत्रात काम करण्यासाठी व विद्यार्थ्यांचे कलागुण विकसित होण्यासाठी एसएसबीटी महाविद्यालयातील मेकॅनिकल विभागात ISHRE हे स्पेशल स्टुडन्ट चाप्टर सुरू करण्यात आले आहे. ज्यामध्ये अगदी द्वितीय वर्षापासूनच विद्यार्थ्यांना या विषयाची विशेष अशी गोडी निर्माण होते व त्यांच्यामध्ये नेतृत्व गुण विकसित होतात. यासोबतच विभागात रोबोटिक्स क्लब स्थापन करण्यात आला असून विद्यार्थ्यांना रोबोटिक्स या अत्याधुनिक विषयाची गोडी निर्माण व्हावी व त्यांना भविष्यात या क्षेत्रात करिअर करण्यासाठी संधी मिळावी यासाठी प्रशिक्षण दिले जाते. अपारंपरिक ऊर्जास्रोतांचा वापर करणे ही आजच्या काळाची गरज आहे. मेकॅनिकल विभागातील विद्यार्थ्यांना या क्षेत्राची ओळख व्हावी व भविष्यात त्यांना या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळावी यासाठी महाविद्यालयाने कटाक्षाने विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असतानाच प्रशिक्षण देण्याचे अवलंबिले आहे.त्यामुळे या विभागात SESI स्पेशल स्टुडन्ट चाप्टर सुरू करण्यात आले आहे. मोठय़ा कंपन्यांना त्यांची उत्पादने तयार करताना लागणारे सुटे भाग तयार करून पुरवणे, लहान आणि मध्यम कंपन्यांकडे त्यांचा स्वत:चा देखभाल आणि दुरुस्ती विभाग नसतो. त्यामुळे अशा कंपन्यांना त्यांच्या उत्पादनासाठी लागणाऱ्या यंत्रांची देखभाल आणि दुरुस्तीसाठी मदत करणारा स्वत:चा उद्योग सुरू करता येऊ शकतो. याशिवाय मेकॅनिकल इंजिनीअिरगमधल्या अनेक उपशाखांमध्ये कन्सल्टन्सी अर्थात सल्लागारी करता येऊ शकते. कन्सल्टन्सी करताना तुम्हाला बऱ्याचदा भांडवलाची गरज नसते. त्यामुळे तो उत्तम बिनभांडवली किंवा कमी भांडवलातला उद्योग आहे. सध्या अॅडिटिव्ह मॅन्युफॅक्चिरग ही नवी उपशाखा मेकॅनिकल इंजिनीअिरगमध्ये उदयाला आली आहे. यात ३-डी पिट्रिंग अर्थात त्रिमिती छपाईचं नवं तंत्रज्ञान आलं आहे. त्यामुळे या ३-डी पिट्रर्सचा वापर करता येऊ शकतो. या क्षेत्रात सल्लागार म्हणून काम करायला भरपूर वाव आहे. एखाद्या कारखान्याला इंडस्ट्रिअल लेआउट म्हणजेच यंत्रे कशी उभारावीत, उत्पादन प्रक्रियेच्या क्रमानुसार विविध यंत्रांचा कारखान्यातला क्रम आणि त्यांच्या जागा निश्चित करणे की, ज्याद्वारे कमीतकमी वेळात आणि कमीतकमी मनुष्यबळात ते उत्पादन कसे तयार करता येऊ शकेल, याचा सल्ला देता येऊ शकतो. विविध उपयोगांसाठी कोणता कच्चा माल वापरावा याचा सल्ला, यंत्रांच्या संरचनेबाबत मार्गदर्शन, असे अनेक स्वयंरोजगार इंजिनीअिरगच्या या शाखेत उपलब्ध आहेत. ज्यांना नोकरी करायची आहे, अशांसाठी वर्कशॉप प्लँट मॅनेजर, डिझाइन इंजिनीअर अशा नोकऱ्या असतात. डिझाइन इंजिनीअर म्हणून काम करतानाही प्रोडक्ट डिझाइन इंजिनीअर आणि प्रोसेस डिझाइन इंजिनीअर अशी पदे असतात. याशिवाय वेगवेगळ्या प्रकारची यंत्रे विविध प्रकारच्या कंपन्यांना विकण्यासाठी सेल्स इंजिनीअर्सची आवश्यकता असते. कारण या यंत्रांबाबतची तांत्रिक माहिती खरेदीदारांना देणे, त्यांच्या गरजा कोणत्या आहेत, हे जाणून ही यंत्रे तयार करणाऱ्या कंपन्यांना त्या मागणीनुसार यंत्रांमध्ये आवश्यक ते तांत्रिक बदल करायला सांगणे, खरेदीदार कंपन्यांच्या गरजांनुसार त्यांना कोणती यंत्रे ही अधिक चांगली उपयोगी ठरू शकतात, याबाबतच्या पर्यायांविषयी मार्गदर्शन करून यंत्र विकणाऱ्या कंपनीच्या यंत्रांचा खप अधिकाधिक कसा वाढेल हे पाहणे, यासाठी नुसता सेल्समन कामाचा नाही, तर तो या विषयातला मेकॅनिकल इंजिनीअिरगचा तज्ज्ञ असणे आवश्यक आहे. त्यामुळे सेल्स इंजिनीअरच्या नोकऱ्याही या क्षेत्रात उपलब्ध आहेत. मेकॅनिकल इंजिनीअिरगचा अभ्यासक्रम पूर्ण करून बाहेर पडणाऱ्या आणि फारसा अनुभव गाठीशी नसलेल्या फ्रेशर इंजिनीअरना त्यांच्या मेरिटनुसार आणि त्यांनी त्यांच्या पदवी अभ्यासक्रमात पूर्ण केलेल्या प्रकल्पांच्या आधारे ४ ते ८ लाखांपर्यंतचे पगाराचे वार्षकि पॅकेज मिळू शकते. मध्यम स्तरावरच्या इंजिनीअर्सना अर्थातच वार्षकि १२ ते १५ लाख किंवा त्याहीपेक्षा अधिक रकमेचे पॅकेज मिळू शकते.
मेकॅनिकल इंजिनीरिंगमध्ये मुलींचे प्रमाण व संधी कमी असतात असा एक गैरसमज फार पूर्वीपासून चालत आला आहे . परंतु हे सत्य नाही. कारण मुलींसाठी डिझाईन , व्यवस्थापन या क्षेत्रात खूप साऱ्या संधी उपलब्ध आहेत . शिवाय इतर विद्याशाखांच्या तुलनेत मेकॅनिकल इंजिनीरिंगमध्ये मुली कमी असल्यास त्यांना त्या प्रमाणात अधिक संधी मिळण्याची शक्यता असते.
अजून एक महत्वाची माहिती म्हणजे प्रत्येक प्रकारच्या क्षेत्रात मग ते सिव्हिल , कॉम्पुटर , इलेक्ट्रॉनिक्स , केमिकल , इलेक्ट्रिकल आदी प्रकारचे कुठलेही क्षेत्र असो अथवा कंपनी असो मेकॅनिकल अभियंत्याची आवश्यकता असते. त्यामुळे
मेकॅनिकल अभियंत्यास रोजगाराच्या संधी अधिक प्रमाणात उपलब्ध होत असतात .
खाजगी क्षेत्रासोबतच विविध सरकारी विभागात देखील मेकॅनिकल अभियंत्यास रोजगाराच्या संधी अधिक प्रमाणात उपलब्ध आहेत. रेल्वे , सैन्य , नेव्ही , ऑर्डनन्स फॅक्टरी या केंद्र सरकारच्या खात्याशिवाय महाराष्ट्र्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभाग , इलेक्ट्रिसिटी बोर्ड , जलविभाग , विविध खात्यांचे ऑडिटर अशा भरपूर ठिकाणी सरकारी नोकरी मेकॅनिकल अभियंत्यांना करण्याची संधी आहे .


