अजित पवारांचं मोठं वक्तव्य,परराज्यातून येणाऱ्या लोकांसाठी RTPCR अनिवार्य :

परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या लोकांसाठीच्या निर्बंधामध्ये बदल करण्यात आले आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या नियमावलीतील तफावत दूर केली असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितलं आहे. ओमिक्रॉनच्या बाबतीत आपण अधिक काळजी घ्यायला हवी, असं ते म्हणाले. परराज्यातून येणाऱ्या लोकांसाठी RTPCR अनिवार्य करण्यात आली असल्याचं अजित पवारांनी सांगितलं.

आता केंद्राशी चर्चा करुनच आता नवीन नियमावली येईल, असंही अजित पवार म्हणाले. शाळांच्या संदर्भात शिक्षणमंत्र्यांसोबत चर्चा झाली. आमची यावर चर्चा झाली होती, त्यावेळी हा नवा विषाणू नव्हता. मात्र विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा मुद्दाही महत्वाचा आहे. आता शिक्षणमंत्री याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलतील, त्यानंतर त्यावर निर्णय होईल, असं पवारांनी सांगितलं. शाळांबाबत मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी वेगवेगळे नियम आहेत. सर्वत्र सारखे नियम असावेत, यासाठी केंद्राशी चर्चा करु, असंही ते म्हणाले.

नव्या विषाणूबाबत वेगवेगळी मतं आहेत. हा विषाणू वेगानं पसरतो मात्र सौम्य आहे, असं तज्ञांचं मत आहे. कधी कधी घेतलेले नियम मागे घ्यावे लागतात, असंही अजित पवार म्हणाले.