पीकविमा मिळण्याकरिता पिकांच्या नुकसानीची माहिती शेतकऱ्यांनी यंत्रणेस तातडीने कळवावी-शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांचे शेतकऱ्यांना आवाहन :


भुसावळ – यंदाही शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र, गेल्या वर्षीचा अनुभव पाहता पिक विमा कंपनी अनेक वायफळ कारणे देऊन मदत देण्याचे टाळत असते. त्यामुळे गेल्यावर्षी अनेक शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवले. त्याचा विचार करून यंदा विम्याबाबत माहिती कळवण्याची प्रक्रिया पुर्ण करणे आवश्यक आहे. यंदा अनेक शेतकऱ्यांनी पीक विमा भरून आपले पीक संरक्षित केले आहे. मात्र, नुकसानीची माहिती कळविण्याऱ्यांची संख्या कमी आहे. सरसकट मागणीची दखल सरकार घेईल, असा विश्वास व्यक्त करून शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांनी भरीव मदत पिकविम्याच्या माध्यमातून मिळण्यासाठी आपण कुठेही कमी पडता कामा नये. यासाठी झालेल्या नुकसानीची माहिती तात्काळ भरून देण्याची गरज असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी नुकसानीची माहिती विमा कंपनीला कळविलेली नाही, अशा शेतकऱ्यांनी ती तातडीने कळविण्याचे आवाहन जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांनी केले आहे.
पिकविमा कंपन्या मुजोर आहेत, गेल्यावर्षी त्यांचा अनुभव राज्य सरकारला व शेतकऱ्यांना आला आहे. आपल्याला अधिकाधिक मदत मिळण्यासाठी जे काही करता येईल ते आपल्याला करावे लागणार आहे. पीकविमा कंपनीने ७२ तासात नुकसानीची माहिती कळवण्याचे केलेल्या आवाहनानुसार माहिती कंपन्यांना ऑनलाइन अथवा ऑफलाइन कळवण्याची आवश्यकता आहे.

पीक विमा कंपन्या या प्रधानमंत्री पीक विमा योजनेद्वारे श्रीमंत होत आहेत हे वास्तव आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या अहवालानुसार, विमा कंपन्यांना गेल्या पाच वर्षांत एकूण 1,38,806 कोटी रुपयांचा प्रीमियम मिळाला आहे. त्या बदल्यात शेतकऱ्यांना 92,427 कोटी रुपयांची रक्कम भरपाई रुपात मिळाली आहे. ही आकडेवारी पाहिली असता मग याचा फायदा कोणाला होतो?, असा प्रश्न उपस्थित होतो. 2020-21 मध्ये संपूर्ण भरपाई वितरित केली गेलेली नाही. आपण चार वर्षांच्या आकडेवारीचे विश्लेषण केले तर विमा कंपन्या 15022 कोटी रुपयांचा नफा मिळाला आहे. शेतकऱ्यांनी 94585 कोटी रुपयांचा दावा केला होता मात्र त्यांना 92427 कोटी रुपये विमा कंपन्यांकडून देण्यात आले आहेत. विमा कंपन्यांनी शेतकर्‍यांचे 9,28,870 दावे रद्द केले आहेत. आजही प्रत्येक राज्यात हजारो शेतकरी पीक नुकसानानंतर भरपाईसाठी भटकत आहेत. कारण, कंपन्यांनी काही अटींच्या आधारे शेतकऱ्यांच्या दावे मान्य करण्यास नकार दिला आहे आणि केंद्र सरकार या सर्व कंपन्यांना पाठीशी घालते असे निदर्शनास आले आहे, असे महाजन यांनी नमूद केले आहे.

आपत्ती विभागाकडूनही मिळणार मदत
राज्य सरकारच्या आपत्ती विभागाकडून शेतकऱ्यांना मदतीचा हात मिळणारच आहे, गेल्या वर्षीही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मदत दिलेली होती. यंदाही त्यांनी आश्वासन दिले आहे, शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणारे मुख्यमंत्री असल्याने त्या मदतीबाबत आपल्या मनात शंका नसल्याचे त्यांनी सांगितले.